‘वंचित’च्या कार्यकारिणीचा प्रकाश आंबेडकरांना ‘धक्का’

 


जिल्हाध्यक्ष देवेंद्र तायडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

‘वंचित’ भाजपची ‘बी’ टीम बनल्याचा जिल्हाध्यक्ष देवेंद्र तायडे यांचा टोला


पिंपरी  : वंचित बहुजन विकास आघाडीला चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर जबरदस्त हादरा बसला असून आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्यासह संपूर्ण कार्यकारणी सदस्यांनी नाना काटे यांना पाठींबा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ‘वंचित’ ही भाजपाची ‘बी’ टीम बनली असून देशातील लोकशाही वाचवायची असेल तर भाजपला हद्दपार करावे लागेल. त्यामुळे आपण वंचितमधून बाहेर पडत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. तायडे यांनी केलेल्या पक्षांतरामुळे नाना काटे यांच्या विजयाचा मार्ग अधिकच सुकर झाला आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत तायडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह चिंचवड विधानसभा निरीक्षक सुनील आण्णा शेळके, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, प्रदेश युवक चे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, मराठवाडा विकास संस्थेचे अरुण पवार, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रवेशावेळी बोलताना तायडे म्हणाले, भाजपच्या सत्ताकाळात देशातील वंचितांच्या शोषणाची परिसीमा गाठली आहे. त्यामुळे वंचित घटकाच्या संरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाला मदत करणारी कोणतीही कृती टाळली पाहिजे, ही कार्यकर्त्यांची भावना होती. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मतांचा आदर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे.

देशात भाजपकडून हुकूमशाही आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वंचित घटकांच्या शोषणाने कळस गाठला आहे. त्यामुळे भाजपचा पराभव करणे ही काळाजी गरज बनली आहे. मात्र, वंचित बहुजन विकास आघाडीने भाजपला पूरक ठरणारी भूमिका या मतदार संघात घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.
 
वंचित हा पक्ष भाजपाची बी टीम बनल्याचे सांगत तायडे पुढे म्हणाले, लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाच्या रक्षणासाठी समविचारी असणाऱ्या महाविकास आघाडीसोबत असणे आवश्यक असल्याचे सर्वच कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आपल्यातील मतांची विभागणी ही भाजपच्या पथ्यावर पडणारी ठरत आहे. चिंचवडच्या पोटनिवडणुकीत ही विभागणी आम्ही टाळणार आहोत.

पक्षाच्या नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात स्थानिक कार्यकर्ता असल्यामुळे एकाही वंचिताचे मत दुसरीकडे जाणार नाही. पक्ष कोणासोबतही असला तरी सर्वसामान्य कार्यकर्ता आणि आम्ही नाना काटे यांना एकगठ्ठा मतदान करून विजयी करणार आहोत. बहुजन, वंचित जनतेनेही विचार करून लोकशाहीचे संरक्षण करणाऱ्या महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्याच पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. आपली एकी भाजपचा पराभव नक्की करू शकते. त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी न पडता वंचित घटकाने नाना काटे यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना किमान ५० हजार मताधिक्क्याने विजयी करावे, असे आवाहनही तायडे यांनी यावेळी केली.

शिंदे गटाच्या शिवसेनेतही फुट
शहरात बाळसे धऱण्यापूर्वीच शिंदे यांच्या शिवसेनेला फुटीचे ग्रहण लागले असून शिंदे गटातील अभिषेक दांगट यांनी नाना काटे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. भाजपसारख्या पक्षाला सत्तेतून हद्दपार करणे व लोकशाहीच्या हितासाठी आपण नाना काटे यांना मताधिक्य मिळवून देऊ असे दांगट यांनी प्रवेशावेळी सांगितले.
‘वंचित’च्या कार्यकारिणीचा प्रकाश आंबेडकरांना ‘धक्का’ ‘वंचित’च्या कार्यकारिणीचा प्रकाश आंबेडकरांना ‘धक्का’ Reviewed by ANN news network on २/२२/२०२३ ०५:०७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".