विधानपरिषद लक्षवेधी : स्वमग्नता मुलांवरील उपचारासाठी प्रत्येकजिल्ह्यात केंद्र सुरू करणार -सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत
नागपूर : स्वमग्नता(ऑटिझम), गतिमंदताया मेंदूविकारांनी त्रस्त मुलांवरील उपचारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सुरू करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत सांगितले.
याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी
लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर मंत्री डॉ. सावंत यांनी निवेदन केले. त्यांनी सांगितले की,
आरोग्य विभागामार्फत शून्य ते 18 वर्षे वयोगटातील
मुलांची तपासणी करून मुलांमध्ये आढळणारे जन्मतः असलेले व्यंग,
विकास विलंब, जीवनसत्वाच्या
कमतरतेमुळे होणारे आजार यांचे वेळेत निदान होऊन योग्य ते उपचार करण्यासाठी
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात
पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
या पथकांमार्फत स्वमग्नता(ऑटिझम),
गतिमंदताया मेंदूविकारांबाबत विद्यार्थी व
अंगणवाडीतील शून्य ते सहा वर्षे वयाच्या बालकांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयात ‘डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन
सेंटर’ स्थापन करण्यात येत आहेत. यामध्ये अंगणवाडी, शाळा
स्तरावरून संदर्भित बालकांच्या बौद्धिक, मानसिक
आणि शारीरिक स्थितीचा विकास आणि गुणात्मक उपचारांसाठी सदरचे केंद्र कार्य करेल. या
केंद्रामध्ये विविध तज्ञांच्या माध्यमातून फिजिओथेरपी, ओक्युपेशनल
थेरपी, ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी,
मानसोपचार, विशेष
शिक्षण, दंत वैद्यकीय यांसारखे उपचार देऊन या
बालकांच्या बौद्धिक, मानसिक आणि
शारीरिक स्थितीचा विकास साधण्यात येईल. तसेच या आजारांचा महात्मा जोतिराव फुले जन
आरोग्य योजनेत समावेशाचा विचार करण्यात येईल, असेही
मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित
पवार, सदस्य राजेश टोपे आदींनी सहभाग घेतला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: