मुंबईच्या पाणीपुरवठ्यात कपात नाही देवीपाडा, काजूपाडा, केतकीपाडा येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपा उपाययोजना करेल - मंत्री शंभुराज देसाई यांची माहिती


 

नागपूर  : मुंबई शहरातील पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात करण्यात आली नाही.बोरीवली (पूर्व) येथील देवीपाडा, काजूपाडा आणि दहिसर (पूर्व) येथील केतकीपाडा परिसराचा बहुतांश भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन हद्दीत अती उंच आणि सखल भागात विभागला आहे. या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका तत्काळ उपाययोजना करीत असल्याची माहिती मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.

      देवीपाडा, काजूपाडा आणि केतकीपाडा येथील पाणीपुरवठ्याबाबत विधानपरिषद सदस्य विलास पोतनीस यांनी प्रश्न उपस्थित केला होता. प्रश्नाला उत्तर देताना श्री. देसाई बोलत होते.

      श्री. देसाई यांनी सांगितले की. महानगरपालिकेने बोरीवली जलाशयाच्या आउटलेटची डिग्री वाढवून पाण्याचा योग्य दाब वाढविला आहे. यामुळे पाणीपुरवठा योग्य दाबाने होत आहे. काजूपाड्यातील अभिनवनगर, बोरीवली (पूर्व) येथील मनपाच्या नागरी प्रशिक्षण संस्था व संशोधन केंद्राच्या आवारात १०० घनमीटरऐवजी १५५ घनमीटर क्षमतेची शोषण टाकी आणि उदंचन संच कार्यान्वित करण्यात आला आहे. देवीपाडा परिसरातही पाणी गळती थांबविण्यासाठी १५० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी कार्यान्वित केली आहे. शिवाय वन हद्दीतील २५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील झडप शोधून फेरफार करण्यात आले आहेत. यामुळे पाण्याच्या दाबात वाढ झाली असून अती उंच भागात सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत आणि योग्य दाबाने होत आहे.

      हनुमान टेकडी या उंच भागातही वेळेचे नियोजन करून पहाटे ४.४० ते सकाळी ६.३५ दरम्यान दोन तास योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. केतकीपाडा परिसरात काही तांत्रिक बदल करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मुंबईतील नागरिकांना निर्धारित वेळेत आणि योग्य क्षमतेने पाणीपुरवठा मिळण्यासाठी महापालिकेने उपाययोजना केल्या असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.

      यावेळी सदस्य सर्वश्री अनिल परब, कपिल पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.

मुंबईच्या पाणीपुरवठ्यात कपात नाही देवीपाडा, काजूपाडा, केतकीपाडा येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपा उपाययोजना करेल - मंत्री शंभुराज देसाई यांची माहिती मुंबईच्या पाणीपुरवठ्यात कपात नाही  देवीपाडा, काजूपाडा, केतकीपाडा येथील पाणीपुरवठा  सुरळीत करण्यासाठी मनपा उपाययोजना करेल  - मंत्री शंभुराज देसाई यांची माहिती Reviewed by ANN news network on १२/२२/२०२२ ०१:३०:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".