वैभववाडीत सर्वाधिक २३० मिमी पावसाची नोंद; नदी-नाले तुडुंब भरले
खारेपाटणमध्ये पूरसदृश स्थिती; अनेक रस्ते पाण्याखाली
पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांकडून 'रेड अलर्ट'
सिंधुदुर्ग, (प्रतिनिधी): गणेशोत्सव तोंडावर असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. आज सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, गेल्या २४ तासांत सरासरी १०६.८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात २३० मिलिमीटर एवढा पडला आहे.
जिल्ह्यातील नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून, अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. खारेपाटण येथील शुक नदीने इशारा पातळी ओलांडल्याने या भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे, तर गड नदीही इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. गगनबावडा-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरही मांडुकली आणि फेजिवडे येथे रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
भारतीय हवामान खात्याने पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मच्छिमार बांधवांनी आणि किनारपट्टीवरील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्ह्यात 'रेड अलर्ट' जाहीर केला आहे.
Sindhudurg
Heavy Rainfall
Flood Alert
Road Closure
Monsoon
#Sindhudurg #Maharashtra #Monsoon #FloodAlert #HeavyRain #RedAlert
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: