पुणे, (प्रतिनिधी): पुणे शहरातील बाणेर पोलीस स्टेशनने विविध गुन्ह्यांमधील तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींमध्ये चैन स्नॅचिंग, मोबाईल चोरी आणि वाद्य पथकाचे ताशे चोरणाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांनी तब्बल ७४ सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून या गुन्ह्यांचा छडा लावला आहे.
बालेवाडी येथील एका महिलेचे मंगळसूत्र चोरीस गेल्याची तक्रार ११ जुलै २०२५ रोजी दाखल झाली होती. पोलिसांनी घटनास्थळावरील आणि परिसरातील ७४ सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून शफिक मोदीन शेख (वय २६, रा. त्रिवेणीनगर) या आरोपीला अटक केली. त्याने त्याच्या साथीदारासोबत हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेले मंगळसूत्र आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली ॲक्टिवा दुचाकी जप्त केली आहे.
याव्यतिरिक्त, बाणेर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे फिरोज अब्दुल कुदुसशहा (वय २१, रा. वाकड) याला मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. आरोपीने बाणेर येथे रॅपिडो बुक करणाऱ्या एका महिलेच्या हातातून १०,००० रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला होता. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल जप्त केला आहे.
तिसऱ्या एका घटनेत, बाणेर पोलीस स्टेशन हद्दीत २६ जून रोजी ‘नादलय वाद्य पथकाचे’ ३० ताशे चोरीस गेले होते. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी ४४ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. या तपासणीतून वसीम हसीबुर शेख (वय २२, रा. सुसगाव) याला अटक करण्यात आली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेल्या १२ ताश्यांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही सर्व कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत आणि त्यांच्या पथकाने केली आहे.
Pune Police
Chain Snatching
Mobile Theft
Arrest
Stolen Property
#PunePolice #ChainSnatching #MobileTheft #Arrest #CrimeNews #BanerPolice #CCTvFootage

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: