मायणी येथे सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी : राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई, दि. ६ ऑगस्ट २०२५: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील मायणी (ता. खटाव) येथे प्रशस्त स्मारक उभारण्यात यावे, असे निर्देश सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. ब्रिटिशकालीन मायणी धरणाच्या बांधकामाची देखरेख सुभेदार रामजी आंबेडकर यांनी केली होती, त्यामुळे याच ठिकाणी स्मारकाची निर्मिती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या बैठकीत माजी आमदार दिलीप येळगावकर, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सोना बागुल, समाज कल्याण आयुक्तालयाचे सहायक आयुक्त शितल सोनटक्के, सातारा सहायक आयुक्त सुनील जाधव यांच्यासह सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते.
राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले की, हे स्मारक पूर्ण झाल्यास सुभेदार रामजी आंबेडकर यांचे हे पहिलेच स्मारक ठरेल. यासाठी जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील जमीन ताब्यात घेण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने प्रस्ताव सादर करावा. तसेच, जमिनीच्या भाडेतत्त्वावर घेण्याबाबतही तपासणी करावी. चांगल्या वास्तुविशारदाकडून स्मारकाचा आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
स्मारकाची देखभाल-दुरुस्ती स्थानिक स्वराज्य संस्थेकडे असल्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीचा ठराव घेण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. सर्व नियमानुसार बाबी पूर्ण करून तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्यमंत्री मिसाळ यांनी प्रशासनाला दिले.
Subedar Ramji Ambedkar, Memorial, Madhuri Misal, Satara, Mayani, Social Justice Minister.
#RamjiAmbedkar #Memorial #Mayani #Satara #MadhuriMisal #SocialJustice #MaharashtraGovernment

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: