बीएससी नर्सिंगचे शिक्षण; ६० विद्यार्थी क्षमतेसह अभ्यासक्रम सुरू होणार
पिंपरी, (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिकेला यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षण संस्थेअंतर्गत ६० विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यास राज्य शासनाने अखेर अधिकृत मंजुरी दिली आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांसाठी शासकीय दरात दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
रुग्णालयाच्या आवारातच नव्याने बांधलेल्या ११ मजली इमारतीच्या तिसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या मजल्यावर ‘परिचर्या विज्ञान संस्था’ म्हणजेच ‘इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेस’ ही संस्था सुरू करण्यात येणार आहे.
या अभ्यासक्रमासाठीची प्रक्रिया जानेवारी २०२२ पासून सुरू झाली होती. महापालिका आयुक्त, स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यानंतर, तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (एमयूएचएस), नाशिककडे अर्ज सादर करून, १६ जुलै २०२५ रोजी शासनाने निर्णय निर्गमित केला. त्यानंतर ३० जुलै २०२५ रोजी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रथम संलग्नता मंजूर करण्यात आली.
या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया वैद्यकीय सेवा संचालनालय, मुंबई (सीईटी-सेल) मार्फत राबविली जाणार आहे. वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर शिक्षण संस्था २०१८ मध्ये सुरू झाल्यापासून २४० हून अधिक विद्यार्थ्यांनी कोविड-१९ काळात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आता या नर्सिंग महाविद्यालयामुळे नर्सिंग कर्मचाऱ्यांची आवश्यकता आणि उपलब्धता यातील तफावत कमी होण्यास मदत होईल. तसेच, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पात्र उमेदवारांना कमी खर्चात सरकारी दरात शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
या यशामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने धोरणात्मक गुंतवणूक झाली असल्याचे मानले जात आहे.
YCM Hospital, Pimpri Chinchwad, Nursing Course, State Government Approval, Medical Education
#YCMHospital #PimpriChinchwad #BSCNursing #MedicalEducation #MaharashtraGovernment #HealthServices #EducationNews #WomenEmpowerment

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: