'झेंडूची फुले' शताब्दी आवृत्तीचे प्रकाशन
मुंबई (विशेष प्रतिनिधी): साहित्यसम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त 'आत्रेय' संस्थेतर्फे दिला जाणारा यंदाचा 'आचार्य अत्रे जीवनगौरव पुरस्कार' प्रख्यात रंगकर्मी अशोक किसनराव हांडे यांना ज्येष्ठ विडंबनकवी वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना 'मराठी बाणा'कार अशोक हांडे यांनी, "हा पुरस्कार माझ्यावरील संस्कारांचा सन्मान असून, ते रुजवणारे सर्व घटक, विशेषतः उंब्रज गावातील भजने, आईच्या ओव्या, हरिपाठ आणि रंगारी बदक चाळीतील संस्कार आठवतात," असे भावोद्गार काढले.
आत्रेय संस्थेतर्फे दरवर्षी १३ ऑगस्ट रोजी आचार्य अत्रे यांच्या जन्मदिनी हा पुरस्कार दिला जातो. या सोहळ्यात हर्षवर्धन देशपांडे, अशोक मुळे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, साहित्यिक महेश केळुस्कर, ॲड. राजेंद्र पै आणि विक्रम पै यांची उपस्थिती होती.
पुरस्काराला उत्तर देताना अशोक हांडे यांनी मराठी संस्कृती, राज्याचा इतिहास, भूगोल आणि धर्म पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. हा पुरस्कार मराठी मातीमुळे आणि इथल्या संस्कारांमुळे मिळाला असल्याचे ते म्हणाले.
यावेळी 'झेंडूची फुले' या अत्रे यांच्या विडंबन काव्यसंग्रहाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्याच्या शताब्दी आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. याचे संपादन डॉ. महेश केळुस्कर यांनी केले आहे. तसेच, 'कऱ्हेचे पाणी' या आत्मचरित्राचे आणि 'अत्रे टोला' व 'अत्रे प्रहार' या ग्रंथांचेही पुनर्प्रकाशन करण्यात आले.
या सोहळ्याचे विशेष अतिथी रामदास फुटाणे यांनी महाराष्ट्रात मराठीवरून सुरू असलेल्या राजकारणावर मिश्किल शैलीत भाष्य केले. मराठी टिकवण्याची जबाबदारी गांभीर्याने स्वीकारण्याची गरज असून, अमराठी लोकांना मराठी भाषिक करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले. ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांनी 'महाराष्ट्र' हे नाव अत्रेंमुळे मिळाल्याची आठवण करून देत, आज अत्रे हवे होते असे उद्गार काढले.
Acharya Atre, Jeevangaurav Puraskar, Ashok Hande, Marathi Culture, Awards, Mumbai, Literary Event, Book Launch
#AcharyaAtre #AshokHande #MarathiCulture #JeevangauravPuraskar #Mumbai #MarathiLiterature #ZenduChiFule #LiteraryAwards
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: