अजित पवारांनी केली चाकण आणि एमआयडीसी भागाची पाहणी
पुणे, (प्रतिनिधी): पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) आकुर्डी येथील मुख्यालयात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हिंजवडीसह चाकण परिसरात अतिक्रमण हटवल्यानंतर त्या ठिकाणी तातडीने रस्ते विकसित करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर मांडेकर, आमदार बाबाजी काळे यांच्यासह विभागीय आयुक्त, पीएमआरडीएचे अधिकारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अतिक्रमण हटवल्यानंतर रस्ते विकासावर भर चाकण एमआयडीसीसह परिसरातील खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे व्यावसायिक, कामगार आणि वाहनधारकांना अनेक अडचणी येतात. या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे असल्याने वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम राबवून अरुंद रस्ते तातडीने रुंद करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. अतिक्रमण काढल्यानंतर रस्ते विकसित झाले नाहीत, तर पुन्हा अतिक्रमण वाढते, त्यामुळे प्रशासनाने समन्वयातून तातडीने काम पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले.
अवजड वाहनांवर वेळेचे बंधन आणि ट्रक टर्मिनलची सूचना या भागात येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अशा वाहनांवर ठराविक वेळेचे बंधन घालावे आणि एमआयडीसी भागात ट्रक टर्मिनल सुरू करण्यावर भर द्यावा, असे निर्देश अजित पवार यांनी दिले. तसेच, वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आरटीओ आणि पोलीस यंत्रणेने संयुक्तपणे नियोजन करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.
हिंजवडीतील काम समाधानकारक गेल्या महिन्याभरात हिंजवडी आणि परिसरातील वाहतूक कोंडी आणि नागरी समस्यांवर प्रशासनाने केलेल्या उपाययोजना समाधानकारक आहेत. उर्वरित कामेही याच गतीने सुरू ठेवण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. चाकण भागातही याच पद्धतीने उपाययोजनांवर भर दिला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकणसह एमआयडीसी भागातील नागरी समस्या आणि वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने विविध ठिकाणांची पाहणी केली. यामध्ये भारत माता चौक मोशी, समृद्धी पेट्रोल पंप सॅनी कंपनी नाणेकरवाडी, बंगला वस्ती मेदनकरवाडी - सासे फाटा, चाकण चौक आणि इतर भागांचा समावेश होता.
Ajit Pawar
Pune Traffic
Chakan MIDC
Road Widening
Encroachment Removal
#AjitPawar #Pune #
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: