लोहमार्ग पोलिसांकडून दिल्लीतून आरोपीला अटक
प्रवाशांच्या मदतीच्या बहाण्याने दागिने चोरी
पुणे आणि मिरज येथील गुन्हे उघडकीस एकूण
पुणे : पुणे रेल्वे पोलिसांनी रेल्वे प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका मुख्य आरोपीला दिल्लीतून अटक करून पुणे आणि मिरज रेल्वे पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपीकडून एकूण ११० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
२५ मे २०२५ रोजी वेरावळ-पुणे एक्सप्रेसने (गाडी क्रमांक ११०८७) प्रवास करणाऱ्या एका महिलेने पुणे रेल्वे स्टेशनवर उतरण्यासाठी मदत करत असल्याचा बहाणा करून चार अनोळखी व्यक्तींनी तिच्या बॅगेतून ५३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरल्याची तक्रार केली होती. या घटनेनंतर रेल्वे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे रमेश उर्फ मोटा (रा. दिल्ली) या आरोपीचे नाव निष्पन्न झाले.
हा आरोपी रेल्वेत चोरी करणारा सराईत गुन्हेगार असल्याने त्याला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला दिल्ली येथे पाठवण्यात आले. दिल्लीतील गुन्हे शाखा आणि रेल्वे पोलीस दलाच्या (RPF) मदतीने पोलिसांनी रात्रभर सापळा रचून रमेश उर्फ मोटा याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. पुणे येथे आणून चौकशी केल्यावर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याने दुसऱ्याच दिवशी मिरज येथेही अशाच प्रकारे चोरी केल्याचे सांगितले, ज्यामुळे मिरज रेल्वे पोलीस स्टेशनमधील गुन्हा क्रमांक ३८/२०२५ देखील उघडकीस आला.
रेल्वे प्रवाशांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये आणि सामान उचलण्यासाठी मदत घेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर अधीक्षक रोहिदास पवार, निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Pune Police
Railway Police
Theft
Arrest
Gold Jewelry
#PunePolice #RailwayCrime #Theft #Arrest #GoldTheft #Pune #Miraj

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: