आमदाराच्या हस्तक्षेपामुळे मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये जीव मुठीत धरून राहण्याची वेळ
पुणे, (प्रतिनिधी): पुणे येथील लोकमान्य नगरमधील ८०३ कुटुंबांच्या घरांच्या पुनर्विकासाला स्थानिक आमदाराच्या हस्तक्षेपामुळे तात्पुरती स्थगिती मिळाल्याने येथील रहिवाशांनी जोरदार निदर्शने केली. 'म्हाडाच्या अनागोंदी कारभारामुळे "कोणी नवीन घर देत का घर" अशी आमची अवस्था झाली आहे,' असे म्हणत लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या वतीने शेकडो रहिवासी रस्त्यावर उतरले.
गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू असताना अचानक मिळालेल्या स्थगितीमुळे रहिवाशांचा संताप वाढला आहे. सध्या येथे अनियमित पाणीपुरवठा, मोडकळीस आलेली बांधकामे आणि ड्रेनेजच्या दुरवस्थेमुळे रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लोकमान्यनगर येथे सन १९६० ते १९६४ दरम्यान उभ्या राहिलेल्या ५३ इमारतींची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. यातील काही इमारतींमध्ये सिमेंट प्लास्टर पडले आहे, भिंतींना तडे गेले आहेत आणि काही इमारती तिरक्या झाल्या आहेत. अशा धोकादायक परिस्थितीत नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत.
या प्रकरणी जोपर्यंत शासनाकडून त्वरित दखल घेतली जात नाही, तोपर्यंत हा लढा चालूच राहणार असून, भविष्यात तो अधिक तीव्र होईल, असा इशारा पुणे लोकमान्यनगर बचाव कृती समितीने दिला आहे.
Lokmanyanagar Redevelopment
Pune Protest
MHADA
Housing Project
Residents' Agitation
#Lokmanyanagar #Pune #MHADA #Redevelopment #Protest #Housing #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: