बागेचे बांधकाम क्षेत्रात रुपांतर झाल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होईल, रहिवाशांचा इशारा
पुणे, दि. ९ ऑगस्ट २०२५: हडपसर येथील अमनोरा टाऊनशिपमधील रहिवाशांनी सेंट्रल गार्डन आणि त्यातील झाडे वाचवण्यासाठी आज 'रक्षाबंधन'च्या शुभ मुहूर्तावर झाडांना राख्या बांधून अनोखे आंदोलन केले. टाऊनशिपमधील २६ एकर सेंट्रल गार्डन कमी करून त्या जागेवर नवीन इमारती बांधण्याचा विकासकांचा डाव असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. याप्रकरणी रहिवाशांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
अमनोरा टाऊनशिप २००४ पासून विशेष टाऊनशिप धोरणांतर्गत विकसित झाली आहे आणि सेंट्रल गार्डन या टाऊनशिपच्या मध्यभागी आहे. हे हरितक्षेत्र रहिवाशांसाठी जीवनदायिनी असून, याच बागेचे मार्केटिंग करून अनेक रहिवाशांना इथे फ्लॅट घेण्यासाठी आकर्षित करण्यात आले होते. मात्र, आता विकासक मूळ आराखड्यात बदल करून बागेचा काही भाग कमी करत आहेत, असा रहिवाशांचा आरोप आहे.
या कृतीचा निषेध करण्यासाठी रहिवाशांनी 'अमनोरा सेंट्रल गार्डन बचाव समिती' स्थापन केली असून, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनाही निवेदन दिले आहे. बागेचे बांधकाम क्षेत्रात रूपांतर झाल्यास हजारो कुटुंबांच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होईल, असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे.
रहिवासी दिलीप पुंड, संजय देशमुख, ॲड. त्र्यंबक खोपडे आदींनी सांगितले की, बागेचे बांधकाम क्षेत्रात रूपांतर करण्याचा निर्णय रद्द न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि वेळप्रसंगी न्यायालयातही दाद मागितली जाईल.
Pune, Amanora Township, Central Garden, Tree Protection, Raksha Bandhan Protest, Chief Minister Devendra Fadnavis.
#Pune #AmanoraTownship #TreeProtection #RakshaBandhan #Protest #GreenPune #SaveTheTrees

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: