सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करावे : सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार
राज्य सरकारने गणेशोत्सव 'राज्य महोत्सव' म्हणून साजरा करण्याचा घेतला निर्णय
'ऑपरेशन सिंदूर', 'स्वदेशी वस्तूंचा वापर' आणि पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याचे गणेश मंडळांना आवाहन
७ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी; थेट दर्शनाचीही सोय उपलब्ध होणार
पुणे, (प्रतिनिधी): गणेशोत्सव हा 'राज्य महोत्सव' म्हणून साजरा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असून, या उत्सवाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले. या वर्षीच्या गणेशोत्सवात 'ऑपरेशन सिंदूर', स्वदेशी वस्तूंचा वापर, युनेस्कोच्या वारसा स्थळांमधील १२ गडकिल्ले आणि पर्यावरण अशा विषयांवर जनजागृती करण्याचे प्रोत्साहन गणेश मंडळांना देण्याची सूचनाही त्यांनी केली.
गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासणे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
ॲड. शेलार यांनी सांगितले की, यंदाच्या गणेशोत्सवात ७ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाच्या वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी. तसेच, प्रसिद्ध गणेश मंडळांच्या थेट दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. गणेशोत्सवादरम्यान केंद्रीय राखीव पोलीस दल आणि पोलीस दलाच्या बँड शोचे तसेच डॉग शोचे आयोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
गणेशोत्सव शांतता आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहन करताना ॲड. शेलार यांनी मंडळांनी स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करावा आणि त्यांच्या कार्याची माहिती देणारे फलक लावावेत, असेही म्हटले.
Ashish Shelar
Ganeshotsav
State Festival
Cultural Affairs
Pune
#AshishShelar #Ganeshotsav #Maharashtra #StateFestival #Pune
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: