आठवड्याला अद्ययावत होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात, ८० वर्षांपासून जागतिक संस्था अद्ययावत नसणे अस्वीकार्य – ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदींची आग्रही भूमिका
रियो डी जेनेरो (ब्राझील), ७ जुलै २०२५: आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या काळात तंत्रज्ञान आठवड्याला अद्ययावत होत असताना, जागतिक संस्था ८० वर्षांत एकदाही अद्ययावत न होणे स्वीकार्य नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवरच्या संस्थांमध्ये सुधारणांची आग्रही भूमिका ब्रिक्स शिखर परिषदेत मांडली आहे.
'ग्लोबल साऊथ' कायम दुहेरी मापदंडांचा बळी
पंतप्रधान मोदी म्हणाले की, विकास असो, संसाधनांचे वितरण असो, किंवा सुरक्षेशी संबंधित विषय असोत, 'ग्लोबल साऊथ'च्या हिताला प्राधान्य मिळालेले नाही. 'ग्लोबल साऊथ' कायम दुहेरी मापदंडाचा शिकार झाला आहे. २०व्या शतकात स्थापन झालेल्या जागतिक संस्थांमध्ये दोन तृतीयांश मानवी समूहाला पुरेसे योगदान मिळालेले नाही. ज्या देशांचे आज जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे योगदान आहे, त्यांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. हा केवळ प्रतिनिधित्वाचा प्रश्न नसून विश्वासार्हता आणि प्रभावीपणाचा प्रश्न आहे, असे सांगून या संस्था २१व्या शतकातल्या आव्हानांना सामोरे जाण्यास असमर्थ असल्याचं त्यांनी ठामपणे प्रतिपादन केलं.
बहुध्रुवीय आणि समावेशक जागतिक व्यवस्थेची गरज
आज जगाला बहुध्रुवीय आणि समावेशक जागतिक व्यवस्थेची गरज असून, याची सुरुवात जागतिक संस्थांमधील व्यापक सुधारणांपासून झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. या सुधारणा केवळ प्रतीकात्मक नसाव्यात, तर त्यांचे वास्तविक परिणामही दिसायला हवेत असे सांगून, नियामक रचना आणि मतदान अधिकारांमध्ये बदल होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, जागतिक व्यापार संघटना, बहुउद्देशीय विकास बँकांसारख्या संस्थांमध्ये सुधारणांसाठी ब्रिक्स समूहांने प्रयत्न करायला हवेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. भारताने कायम अखिल मानवतेच्या हितासाठी काम करणे आपली जबाबदारी मानली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध ब्रिक्स
देशांसोबत रचनात्मक योगदानासाठीची वचनबद्धता पंतप्रधानांनी व्यक्त केली. परिषदेत ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. आंतरराष्ट्रीय व्यवस्था एकविसाव्या शतकातील नवी बहुध्रुवीय वास्तविकता दर्शवत नसताना, त्यामध्ये सुधारणांसाठी योगदान देणे ही ब्रिक्सची जबाबदारी असल्याचे लुल्ला दा सिल्व्हा यांनी सांगितले. तिरस्काराच्या विचारधारेचा कोणत्याही धर्माशी वा राष्ट्रीयत्वाशी संबंध नसल्याचेही ते म्हणाले.
BRICS Summit, Prime Minister Narendra Modi, Global Institutions Reform, Global South, International Relations, Lula da Silva, Pahalgam Attack
#BRICSSummit #PMModi #GlobalReform #GlobalSouth #InternationalRelations #LulaDaSilva #India #Brazil #AIera

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: