वाघोली-लोहगाव रस्त्याची दुर्दशा : पुणे महापालिकेच्या निष्क्रीयतेविरोघात 'वाको'चे तीव्र आंदोलन (VIDEO)
पुणे महापालिकेची निष्क्रियता की उघडपणे भ्रष्टाचार? – 'वाको'चा सवाल
पुणे, ७ जुलै २०२५: 'स्मार्ट सिटी'च्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च करण्यात येत असताना, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील वाघोली परिसरातील प्रमुख निवासी संकुलांना (अथकज विजय विहार, प्राईमेरा होम्स आणि रोहन अभिलाषा) अजूनही मूलभूत रस्ता व ड्रेनेजसारख्या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. वाघोली-लोहगाव रोड ते अग्निशमन केंद्र, अथकज विजय विहार, मोरे कॉर्नर, रोहन अभिलाषा रस्त्याची अवस्था अक्षरशः नरकयातना भासत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर 'वाको वेल्फेअर असोसिएशन'ने जोरदार निदर्शन आंदोलन केले.
जीवघेणा प्रवास आणि चिखलाचे साम्राज्य
ठिकठिकाणी चिखल, घाण, मोठे खड्डे आणि पाण्याचे साचलेले डबके यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. लहान मुले, वृद्ध आणि कामावर जाणाऱ्या नागरिकांसाठी हा रस्ता एक जीवघेणा प्रवास ठरत आहे. विशेषतः अथकज विजय विहारमध्ये देशासाठी आपले जीवन समर्पित करणारे सैन्यातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि जवान वास्तव्यास आहेत, ज्यांना त्यांच्याच शहरात अशा अवस्थेत राहावे लागत असल्याबद्दल आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
रहिवाशांच्या प्रमुख मागण्या
या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाको वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अनिल कुमार मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. टीम वाको आणि अन्य रहिवासी संघटनांच्या वतीने खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
वाघोली-लोहगाव रोडचे तातडीने डांबरीकरण आणि दुरुस्ती करण्यात यावी.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर योग्य जलनिकासी व ड्रेनेज व्यवस्था करण्यात यावी.
संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
मंजूर केलेल्या १० लाख रुपयांच्या निधीचा हिशेब सार्वजनिक करण्यात यावा.
१० लाखांच्या निधीचे काय झाले? भ्रष्टाचाराचा आरोप
रस्ता दुरुस्तीसाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता, तर प्रत्यक्षात काम का झाले नाही, असा संतप्त सवाल निदर्शनादरम्यान उपस्थित करण्यात आला. ही पुणे महापालिकेची निष्क्रियता आहे की पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा प्रकार, असे गंभीर आरोप आंदोलकांनी केले.
टीम वाकोने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, जर एक महिन्याच्या आत काम सुरू झाले नाही, तर पुढील टप्प्यात तीव्र आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल. पुणे 'स्मार्ट सिटी' प्रकल्पाच्या दाव्यांमधील आणि वास्तवातील हा फरक, प्रशासनाच्या आणि शासनाच्या असंवेदनशीलतेचे स्पष्ट उदाहरण असल्याची टीका आंदोलकांनी केली. पुणे खरोखर स्मार्ट सिटी बनत आहे की केवळ फाईल्समध्ये आणि जाहिरातींमध्येच तिचे तेज झळकत आहे, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.
Wagholi Lohegaon Road, Pune Municipal Corporation, WACO Welfare Association, Road Condition, Infrastructure, Citizen Protest, Corruption Allegations, Smart City
#Wagholi #Pune #RoadSafety #PMC #SmartCity #CitizenProtest #Corruption #Infrastructure #WACO #PuneTraffic

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: