नवनगर प्राधिकरणाच्या प्रॉपर्टी ‘फ्री होल्ड’ करण्याबाबत लवकरच मंत्रिमंडळात निर्णय; कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन
पिंपरी-चिंचवड, १७ जुलै २०२५: पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (PCNTDA) हद्दीतील प्रॉपर्टी ‘फ्री होल्ड’ (Free Hold) करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, याबाबतचा निर्णय लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल, असे आश्वासन कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी आज सभागृहात दिले. यासंदर्भात मांडण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.
सिडको आणि पीएमआरडीच्या धर्तीवर निर्णय अपेक्षित
सिडको (CIDCO) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या हद्दीतील मिळकती ज्याप्रमाणे महायुती सरकारने ‘फ्री होल्ड’ करण्याचा निर्णय घेतला, त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) कार्यक्षेत्रातील प्राधिकरणाच्या प्रॉपर्टी ‘फ्री होल्ड’ करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील प्रस्ताव महसूल व वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे.
नागरिकांच्या अडचणी दूर होणार
२०२१ मध्ये नवनगर प्राधिकरणाचे पीएमआरडीएमध्ये विलिनीकरण झाल्यानंतर त्याच्या मालमत्तांचे विभाजन पीसीएमसी आणि पीएमआरडीमध्ये करण्यात आले होते. प्राधिकरणाच्या ४० वर्षांपूर्वी विकसित केलेल्या प्रॉपर्टी ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने वाटप केल्यामुळे त्यांचा पुनर्विकास, वारस नोंदी आणि हस्तांतरण प्रक्रिया करताना मिळकतधारकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणी दूर करण्यासाठी सातत्याने मागणी होत हो्ती.
११ हजार मिळकतधारकांना आधीच दिलासा
दरम्यान, पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील ११ हजार २९३ सदनिका आणि ४९५ गाळेधारकांच्या प्रॉपर्टी ‘फ्री होल्ड’ करण्याचा निर्णय ११ ऑक्टोबर २०२४ रोजीच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता, आणि त्याचा शासन निर्णय (GR) देखील प्रसिद्ध झाला आहे. यामुळे या मिळकतधारकांना दिलासा मिळाला आहे. आता उर्वरित पीसीएमसीच्या कार्यक्षेत्रातील मिळकतींबाबत निर्णय होणे बाकी आहे.
Pimpri Chinchwad, PCNTDA, Free Hold Property, Cabinet Decision, Uday Samant, Mahesh Landge, Maharashtra Government, PMRDA
#PimpriChinchwad #FreeHold #PCNTDA #UdaySamant #MaheshLandge #MaharashtraCabinet #PropertyRights #PMRDA

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: