अहमदाबाद, ९ जुलै : अहमदाबाद येथील विमान अपघातात (Ahmedabad Plane Crash) सापडलेल्या मानवी अवशेषांवर डीएनए सॅम्पल जुळल्यानंतर, सर्व नश्वर अवशेषांवर काल सन्मानपूर्वक धार्मिक विधी करण्यात आले. या दुःखद घटनेतील मृतांना योग्य सन्मान देण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना या कठीण काळात सहकार्य पुरवण्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया हाती घेण्यात आली होती.
डीएनए सॅम्पल जुळण्याच्या प्रक्रियेदरम्यान रुग्णालयाच्या प्रशासनाने मृतांच्या कुटुंबियांना माहिती दिली होती की, विकृत मानवी अवशेषांची डीएनए सॅम्पल जुळवण्याची प्रक्रिया सुरू असल्याने भविष्यात त्यांच्या कुटुंबियांचे आणखी नश्वर अवशेष मिळू शकतात. या प्रक्रियेअंती एकूण २६ मृतांचे नश्वर अवशेष सापडले, त्यानंतर सर्व संबंधित कुटुंबियांशी संपर्क साधण्यात आला होता.
या २६ पैकी सात कुटुंबांनी त्यांच्या आप्तांचे अवशेष धार्मिक विधींसाठी स्वतः सोबत नेले. उर्वरित कुटुंबांनी (१९) रुग्णालयाच्या प्रशासनाला त्यांच्या वतीने धार्मिक विधी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार, या १९ मानवी अवशेषांवर सरकारी यंत्रणेमार्फत अंतिम धार्मिक विधी करण्यात आले.
ज्या १९ मृतांच्या नश्वर अवशेषांची अंतिम विधी करायची होती, त्यापैकी एका मुस्लिम व्यक्तीचा दफनविधी त्यांच्या धार्मिक विधीनुसार मौलवींद्वारे कुराण शरीफच्या आयतांचे पठण करून संपूर्ण सन्मानाने करण्यात आला. तर, १८ हिंदू मृतांच्या नश्वर अवशेषांची अंतिम क्रिया हिंदूविधीप्रमाणे वाडज येथे पार पडली. त्यानंतर, त्यांचे अस्थिकलश संपूर्ण सन्मानपूर्वक साबरमती नदीच्या नारन घाटावर विसर्जित करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: