दिव्यांग सर्वेक्षण, नालेसफाई, वृक्षारोपण, बायोमायनिंगसह अनेक प्रकल्पांना हिरवा कंदील
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विविध विभागांचे प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय: आजच्या स्थायी समिती बैठकीत प्रभाग क्र. २६ पिंपळे निलख व इतर परिसरातील नाल्यांची स्थापत्य विषयक कामे आणि नालेसफाई करण्याच्या खर्चास प्रशासकांनी मान्यता दिली. तसेच, पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग नागरिकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनचक्राचे मॅपिंग करण्याच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावालाही मंजुरी मिळाली.
याव्यतिरिक्त, प्रभाग क्र. १९ मधील कुकी नाला दुरुस्तीची कामे, महापालिकेचे रस्ते, उद्यान आणि मोकळ्या जागांवर लागवडीसाठी वृक्षारोपणाची रोपे पुरवणे, स्वच्छ भारत मिशन २.० योजनेअंतर्गत मोशी कचरा डेपोतील जुन्या डंपिंग केलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग करणे या प्रकल्पांनाही मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे गरजू रुग्ण सहाय्यता निधी संस्था सुरू करणे, आणि प्रभाग क्र. २ येथील पेठ क्र. ५/८ येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याकरिता ताब्यात आलेल्या उर्वरित जागेत स्थापत्य विषयक व विद्युत विषयक कामे करणे आदी विषयांना येणाऱ्या खर्चासही प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते 'पे ॲन्ड पार्क' आणि 'व्हॉट्सॲप पार्किंग' सुविधेचे उद्घाटन
पिंपरी चिंचवड महापालिकेने नागरिकांना अधिक सुलभ पद्धतीने पार्किंग बुक करता यावे यासाठी ‘पे ॲन्ड पार्क’ उपक्रमांतर्गत खास ‘व्हॉट्सॲप पार्किंग’ ही डिजिटल सेवा सुरू केली आहे. या नव्याने विकसित करण्यात आलेल्या सेवेचे उद्घाटन स्थायी समिती बैठकीत आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.
या सुविधेचा वापर करून नागरिक थेट व्हॉट्सॲपवरून वाहन पार्किंग बुक करू शकतात. हे बुकिंग वापरकर्त्याच्या नावाने निश्चित वेळेसाठी ठेवले जाते. वाहन वेळेत पार्क न केल्यास वापरकर्त्याला तत्काळ सूचना पाठवली जाते आणि ती जागा पुढील नागरिकासाठी खुली केली जाते. शहरात १० ठिकाणी ही सुविधा कार्यान्वित झाली असून, यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून वाहनतळ (पार्किंग) व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होणार आहे.
या सेवेमुळे कागदपत्रे किंवा तिकिटाची गरज पडणार नसून प्रत्यक्ष (रिअल-टाईम) माहिती आणि आरक्षण स्थिती (बुकिंग स्टेटस) व्हॉट्सॲपवरच मिळणार आहे. शिवाय स्मार्ट अलर्ट्सद्वारे वेळेचे व्यवस्थापनदेखील होणार आहे. महापालिकेच्या या डिजिटल पुढाकारामुळे पार्किंग प्रक्रियेत सुसूत्रता आणि वेळेचा अपव्यय टळणार आहे, तसेच शहरातील वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा होणार असल्याची माहिती शहरी दळणवळण विभागाचे सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी दिली.
Pimpri Chinchwad Municipal Corporation, Standing Committee Meeting, Administrator Shekhar Singh, Development Works, Digital Parking, WhatsApp Parking, Pay and Park, Urban Infrastructure
#PCMC #PimpriChinchwad #StandingCommittee #UrbanDevelopment #DigitalIndia #SmartParking #ShekharSingh #CivicWorks

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: