पुणे, १५ जुलै २०२५: पुण्यातील प्रसिद्ध राजीव गांधी प्राणीसंग्रहालयामध्ये मागील चार ते पाच दिवसांत तब्बल १४ चितळांचा (हरणांचा) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे वन्यजीवप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, हा मृत्यू विषाणूजन्य आजारामुळे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेची दखल घेत भाजप आमदार हेमंत रासने यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला. इतर प्राण्यांना या रोगाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
विषाणूजन्य आजाराची शक्यता, तपासणी अहवालाची प्रतीक्षा
आमदार रासने यांनी विधानसभेत बोलताना सांगितले की, "कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात गेल्या काही दिवसांत १४ चितळांचा अचानक मृत्यू झाला आहे. अजूनही त्यांचे शवविच्छेदन (post-mortem) अहवाल आलेले नाहीत. हा मृत्यू साथीच्या रोगामुळे झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर प्राण्यांना त्याचा काही प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी शासनाने तातडीने योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत," अशी मागणी त्यांनी केली.
वन्यजीवांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
या घटनेबद्दल बोलताना हेमंत रासने यांनी आपली चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "कात्रजच्या राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात १४ चितळांचा मृत्यू ही अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक घटना आहे. या घटनेमुळे वन्यजीवांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत शवविच्छेदन अहवाल येत नाही, तोपर्यंत साथीच्या रोगाची शक्यता नाकारता येत नाही."
प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात
रासने यांनी प्रशासनाला तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन केले. "प्राणीसंग्रहालय पुणे शहरासह राज्यातील पर्यटकांचे एक महत्त्वाचे आकर्षण केंद्र आहे. त्यामुळे येथील प्राण्यांची सुरक्षितता ही सर्वाधिक महत्त्वाची आहे. प्रशासनाने याप्रकरणी तातडीने दक्षता घ्यावी आणि इतर प्राण्यांना या रोगापासून वाचवण्यासाठी पावले उचलावीत," असे त्यांनी म्हटले.
Pune News, Katraj Zoo, Chital Death, MLA Hemant Rasne, Vidhan Sabha, Wildlife Safety, Maharashtra
#Pune #KatrajZoo #ChitalDeath #HemantRasne #MaharashtraAssembly #WildlifeSafety #PuneNews #MaharashtraPolitics

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: