राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाची धडक कारवाई; १ कोटी ३३ लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त, एक अटकेत
पुणे, १२ जुलै २०२५: राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या सासवड येथील भरारी पथकाने केलेल्या धडक कारवाईत सासवड गावच्या हद्दीतील वीर फाटा, जेजुरी-सासवड रोड, पुरंदर येथे १ कोटी ३३ लाख ७८ हजार ४०० रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा व संबंधित मुद्देमाल जप्त केला आहे. ही माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली.
सासवड विभागाच्या पथकाने सापळा रचून टाटा कंपनीचा एलपीटी (१२१२) या सहाचाकी माल वाहतूक कंटेनर (क्र. MH-४९-एटी-३४७१) वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान, त्या कंटेनरमध्ये गोवा राज्य बनावटीचे 'रॉयल ब्लु माल्ट व्हीस्की' मद्याचे १८० मि.ली. क्षमतेच्या बाटल्यांचे एकूण १२०४ बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये ४८ बाटल्या याप्रमाणे एकूण ५७ हजार ७९२ बाटल्या होत्या. या मद्यसाठ्याची किंमत १ कोटी १५ लाख ५८ हजार ४०० रुपये इतकी आहे. मद्यसाठ्यासह, वाहन आणि मोबाईल मिळून एकूण १ कोटी ३३ लाख ७८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या गुन्ह्यामध्ये वाहनचालकाविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ च्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे.
या यशस्वी कारवाईत उपअधीक्षक संतोष जगदाळे आणि निरीक्षक संभाजी बरगे यांनी महत्त्वपूर्ण सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक संभाजी बरगे हे करीत आहेत.
जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक आणि विक्रीविरुद्ध नियमित कारवाई सुरू राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांना अवैध मद्य निर्मिती, वाहतूक किंवा विक्रीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास, त्यांनी टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२६०५८६३३ यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Illegal Liquor, Excise Department, Pune Crime, Alcohol Smuggling, Saswad
#Pune #ExciseRaid #IllegalLiquor #CrimeNews #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: