चिपळूणमध्ये जखमी बिबट्याची यशस्वी सुटका, उपचारासाठी पुण्यात हलवले

 


चिपळूण दि. १२ जुलै २०२५: चिपळूण तालुक्यातील मौजे ओवळी येथील बौद्धवाडीमध्ये श्री. विलास मोहिते यांच्या गुरांच्या गोठ्यात वारंवार येऊन बसणाऱ्या बिबट्याची अखेर वन विभागाने यशस्वीरीत्या सुटका केली आहे. हा बिबट अशक्त आणि जखमी असल्याने त्याला उपचारासाठी पुणे येथील रेस्क्यू ट्रान्सीट ट्रीटमेंट सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.

बिबट्याचा गोठ्यात ठिय्या: 

दिनांक ०६/०७/२०२५ पासून श्री. मोहिते यांच्या गुरांच्या गोठ्यात बिबट्या येत असल्याची माहिती त्यांनी वन विभागाला दिली. त्यानुसार, वनपाल श्री. एस. एस. सावंत, वनरक्षक श्री. कृष्णा इरमले आणि श्री. राहुल गुंठे यांनी घटनास्थळी पाहणी केली असता, तिथे बिबट्याचे अस्तित्व आढळले. त्याला पळवून लावण्याचे उपाय केले असता, तो काही काळ निघून जायचा आणि पुन्हा वातावरण शांत झाल्यावर गोठ्यात येऊन बसायचा.

अशक्त बिबट्याला पकडण्यासाठी व्यूहरचना: 

नंतर केलेल्या पाहणीत तो बिबट्या अशक्त आणि आजारी असल्याचे दिसून आले. वन विभागाच्या पथकाने गोठ्याच्या बाहेर आणि पायवाटेच्या बाजूला ट्रॅप कॅमेरे लावले, तसेच ट्रॅप पिंजऱ्यात भक्ष ठेवून तो पिंजराही लावला. मात्र, बिबट पिंजऱ्यात न येता पुन्हा गोठ्यातच येऊन बसू लागला.

वन विभागाची तत्परता: 

अखेरीस, दिनांक ११/०७/२०२५ रोजी विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती. गिरिजा देसाई यांच्या सूचनेनुसार, सहाय्यक वन संरक्षक, रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती. प्रियंका लगड यांनी स्वतः स्थळ पाहणी केली. त्यांनी पिंजऱ्याची जागा बदलून तो थेट श्री. मोहिते यांच्या गुरांच्या गोठ्यातच भक्ष ठेवून लावला. त्याच रात्री ८:३० वाजता हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला.

जखमी बिबट्यास उपचारासाठी पुण्यात रवाना: 

पकडलेल्या बिबट्याची पाहणी केली असता तो नर जातीचा, अंदाजे ४ ते ५ वर्षांचा पूर्ण वाढ झालेला आणि त्याच्या मानेवर जखम असल्याचे दिसून आले. विभागीय वन अधिकारी श्रीमती. गिरिजा देसाई यांनी पाहणी केल्यानंतर, या जखमी बिबट्यास तातडीने वन विभागाच्या अँब्युलन्सने पुणे येथील रेस्क्यू ट्रान्सीट ट्रीटमेंट सेंटर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.

बचाव कार्यात सहभाग: 

सदर बचावकार्य श्रीमती. गिरिजा देसाई, विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती. प्रियंका लगड, सहाय्यक वन संरक्षक रत्नागिरी (चिपळूण), श्री. आर. एस. परदेशी, वन परिक्षेत्र अधिकारी चिपळूण, श्री. एस. एस. सावंत, वनपाल चिपळूण, श्री. सुरेश उपरे, वनपाल सावर्डे, श्री. कृष्णा इरमले, वनरक्षक कोळकेवाडी, श्री. राहुल गुंठे, वनरक्षक रामपूर आणि श्री. नंदकुमार कदम, वाहन चालक यांनी पार पाडले.

या बचाव कार्यात ओवळी गावचे पोलिस पाटील श्री. अजिंक्य शिंदे, ग्रामस्थ शुभम रवींद्र शिंदे, वेदांत प्रकाश शिंदे, उदय शिवाजी कदम, दशरथ रामचंद्र शिंदे, सुजल प्रफुल शिंदे, आर्यन संतोष घाग, सुजल राजेश शिंदे, धावू कानू शेळके, मुंकुद सुरेश हिलम, संदीप सावंत, तसेच गोठा मालक श्री. विलास शिंदे आणि श्री. सुरेश शिंदे यांनी मोलाची मदत केली.

चिपळूणमध्ये जखमी बिबट्याची यशस्वी सुटका, उपचारासाठी पुण्यात हलवले चिपळूणमध्ये जखमी बिबट्याची यशस्वी सुटका, उपचारासाठी पुण्यात हलवले Reviewed by ANN news network on ७/१३/२०२५ ०९:४५:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".