सागरी समुदायाचा उपेक्षित इतिहास आणि लोकनेते दि. बा. पाटील यांचे महत्त्व
महाराष्ट्राच्या २,५०० वर्षांच्या लिखित इतिहासात, आगरी, कोळी, भंडारी, कराडी, गावित यांसारख्या सागरपुत्रांनी आपले सागरी अस्तित्व अखंड संघर्ष करून जपले आहे. हे लोक छत्रपती शिवरायांच्या आरमाराचे लढवय्ये मानले जातात. त्यांच्या पराक्रमाचा इतिहास स्वदेशी हिंदू वैदिक इतिहासकारांनी लिहिला नाही, कारण मनुस्मृतीच्या माध्यमातून त्यांना लिहिण्याचा, बोलण्याचा, वेद-उपनिषदे ऐकण्याचा अधिकार नाकारण्यात आला. तरीही परकीय इतिहासकार त्यांचे ऐतिहासिक महत्त्व नाकारू शकले नाहीत. निसर्ग, समुद्र, खाडी, नद्या, सागरी किल्ले आणि बंदरे यातील त्यांचे अस्तित्व आजही कोकणच्या भूगोलातून हजारो वर्षे साक्ष देत उभे आहे. समुद्राच्या लाटांप्रमाणेच हे समुदाय अन्यायाविरोधात बेधडक लढणारे आहेत.
मानवी गुणांचे योग्य मूल्य समजण्यासाठी उच्च मानवी जीवन मूल्ये रुजवावी लागतात; ती केवळ उच्च कुळात किंवा वर्णात जन्माला आल्याने वंशपरंपरेने मिळत नाहीत. आपल्या कर्तृत्वाने स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवरायांनी आगरी, कोळी, भंडारी, कराडी या सम्राट अशोक यांच्या काळातील आंतरराष्ट्रीय व्यापार आणि जागतिक लढाया लढणाऱ्या लोकांना ओळखले होते.
पेशवाईतील गुलामी आणि लोकनेते दि. बा. पाटील यांचा वारसा
छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर, पेशवाईत सागरपुत्र आगरी-कोळ्यांचे केवळ समुद्र, जमीन, पाणी, जंगल यांचेच अधिकार संपविले गेले नाहीत, तर त्यांना शिक्षण, धर्म आणि मानवी हक्क नाकारून जन्माधारित गुलामीत टाकण्यात आले. याची साक्ष महात्मा जोतिबा फुले आपल्या 'गुलामी' या ग्रंथातून देतात. लोकनेते दि. बा. पाटील यांना महात्मा जोतिबा फुले यांनी आपले गुरू मानले आहे. मात्र, 'एकही आगरी-कोळी महात्मा जोतिबा फुले यांना वैचारिक अर्थाने गुरू मानतो का?' हा एक मोठा प्रश्न आहे, कारण ज्यांनी आम्हाला धार्मिक अर्थाने गुलाम केले, त्यांना गुरु मानून आम्ही स्वतंत्र होऊ शकत नाही. महाराष्ट्रात विचारांचा संघर्ष हा आम्हाला गुलाम करणाऱ्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या उच्चवर्णीय विरुद्ध समस्त स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र असा आहे. महाराष्ट्राच्या लोकसागरात पोहत असताना आपण सावध आणि जागृत असले पाहिजे.
समुद्री जीवनात बोट खडकावर आपटून सर्वनाश होऊ नये म्हणून दीपस्तंभ धोक्याची जागा दाखवतो. त्याचप्रमाणे, देशाच्या, राज्याच्या राजकारणात, समाजकारणात, धर्मकारणात आम्हास धोका कुठे आहे, हे लोकनेते दि. बा. पाटील आम्हाला सांगून गेले.
आजची फसवणूक आणि नवी मुंबई विमानतळाचा प्रश्न
आज सर्व क्षेत्रात आपली फसवणूक आणि पराभव कोणामुळे होत आहे, हे आम्हास समजत नाही, कारण आम्हास दि. बा. पाटील समजलेच नाहीत. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळास का मिळत नाही, याचे उत्तर दि. बा. पाटील यांनी आपल्या सिडको विरुद्धच्या संघर्षातून दिले आहे. सात बेटांच्या मुंबईचे आगरी, कोळी, भंडारी, कराडी, ईस्ट इंडियन आदिवासी मालक होते. मुंबई शहराच्या विकासासाठी त्यांनी आपली शेती, बागायती, मिठागरे, बंदरे, वीटभट्टी, रेती आणि सागरी व्यापार यांचे बलिदान दिले. स्वातंत्र्यानंतर कोणत्याच सरकारने त्यांचे पुनर्वसन केले नाही. मनुस्मृतीनुसार शूद्र, ओबीसी, आगरी-कोळ्यांची सारी संपत्ती जप्त करा, असे सांगते. पेशवाईत आलेली हिंदू धार्मिक गुलामी आपल्याला समजून आली नाही; ती महात्मा जोतिबा फुले, सावित्रीमाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समजली. त्यांच्या जीवनसंघर्षाप्रमाणे आचरण करणारे लोकनेते दि. बा. पाटील होते. मुंबईच्या जमिनीची लूट करणारे याच देशातील ब्राह्मण, मराठा, वैश्य राज्यकर्ते समजून घेणे, हे जमीन हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येक नेतृत्वाचे आणि जमीन मालक, कुळ, घरमालक, गावठाणात राहणारे यांचे आद्य कर्तव्य आहे.
महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी जमीन हवी म्हणून जमीन कसणाऱ्या शेतकरी कुळे, ताबा, कब्जा, वहिवाटदार यांचे अधिकार संपविण्यात आले आहेत. नुकतेच वर्सोवा कोळीवाड्यातील भंडारी समाजाचे लढाऊ नेते मनोजभाई माशेलकर यांनी अंधेरी मुंबई येथील तहसीलदार यांना ते वहिवाट अर्थात "सुप्रीम मालकीत" असणाऱ्या जमिनीबद्दल प्रश्न विचारला. उत्तर आले की, अंधेरी मुंबई येथे कुळ कायदा संपला, लागत नाही. संविधानात असलेला आमच्या हक्कातील कायदा कसा संपू शकतो? अर्थात या विषयावर सोमवारी जाहीर सुनावणी आम्ही ठेवली आहे. ही नव्या पेशवाईची नांदी आहे. महाराष्ट्राचा "सातबारा जिवंत" करून वारस नोंदी करायला निघालेले माननीय महसूल मंत्री बावनकुळे यांच्या मंत्रालयाच्या मुंबईत आमची ही अवस्था असेल, तर देशाचे काय?
इतिहास, संघर्ष आणि आजचे वास्तव
छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य कुणी संपविले, मुसलमानी, इंग्रज राज्यकर्त्यांनी की पोर्तुगीजांनी, याचे उत्तर सातबारा आगरी-कोळी लोकांच्या हातून गेल्यावर शेतकऱ्यांना कळले. इतिहासकार काहीही म्हणोत, त्यानंतर खोत, सावकार या उच्चजातीय ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील हे धर्माने हिंदू असूनही त्यांना आंदोलन का करावे लागले? १ एप्रिल १९५७ साली आगरी, कोळी, भंडारी, ओबीसी, एससी, एसटी संघर्षातून कुळ कायदा आला. पुढील तीनच वर्षांत इंडस्ट्रियल झोन जाहीर करून मुंबई, ठाणे, रायगडात आमच्या जमिनी अक्षरशः फुकट लुटल्या गेल्या. १९७० साली सिडको आली. जेएनपीटी, नेव्ही, ओएनजीसी, सेझ, नवी मुंबई विमानतळ, नैना, एमएमआरडी, एमएसआरडी, सर्व महानगर पालिका, क्लस्टर, एसआरए यात सत्ताधारी जातीशिवाय आहे कोण? पुनर्वसन कुठे आहे?
लोकनेते दि. बा. पाटील यांची साडे बारा टक्के योजना ही हुतात्म्यांच्या त्यागातून मिळालेली आहे. ती आतातरी साहेब गेल्यानंतर का होईना, पूर्ण करा, असे आपला एकही आमदार, खासदार बोलू शकत नाही. ते लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळास देतील ही अंधश्रद्धा आहे. प्रत्यक्ष देवावर श्रद्धा नाकारणाऱ्या लोकनेते दि. बा. पाटील यांचे आपल्या लोकांवर किती प्रेम असेल? सिडको विरुद्ध न्यायासाठी लढणाऱ्या आगरी, कोळी, कराडी प्रकल्पग्रस्तांवर वसंत दादा पाटील हा मराठा मुख्यमंत्री गोळ्या झाडतो. आपले लोक त्यात बळी पडतात. यात न्यायासाठी लढणाऱ्या लोकांना जो जिवंत करू शकत नाही, त्यांना ठार करणाऱ्यांना प्रश्नही विचारू शकत नाही, असा निष्क्रिय देव काय कामाचा. लोकांना न्याय देणारा आमचा नेता आमच्याच भूमीत त्याचा हक्काचा मान सन्मान मागतोय.
दगडाच्या मूर्तीत, मातीच्या मूर्तीत प्राण प्रतिष्ठा करणारे भटजी मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेत. त्यांना क्षत्रिय एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांची सत्तेची तलवार सोबत असताना, शेतकरी न्यायाचे छोटेसे काम जमत नसेल? ही सत्ता कोणासाठी?
आवाहन आणि अस्मिता
शूद्र ओबीसी लोकांच्या विरोधी असलेल्या सत्तेला दि. बा. पाटील ओळखत होते. म्हणूनच आपल्या आजच्या सुखाला कारण झालेल्या पाच हुतात्म्यांचे रक्त वाया जाणार नाही, ते जाऊ द्यायचे नसते. याचा अर्थ दहा मिनिटे डोळे मिटून अंतर्मनात जा, तुमचे उत्तर तुम्हाला मिळेल. मला समजले. ते तुम्हास समजावे म्हणून मी लढत आहे, संघर्ष करत आहे. लोकनेते दि. बा. पाटील ही आमची अस्मिता आहे. ती कुणाच्याही पायावर गहाण ठेवू नका. लढत राहा, विजय तुमचा आहे. निसर्ग हाच साक्षीदार आहे. जेव्हा आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने लोकनेते दिसतील, तेव्हाच आपण विजयी होऊ. बाकी सोंगाड्यांना भुलू नका.
जय आई एकवीरा.
- राजाराम पाटील,उरण, जिल्हा रायगड.
Loknete D.B. Patil, Agri Koli Bhandari Community, Sagarpurtra, Navi Mumbai Airport, Land Rights, Social Justice, Historical Injustice, Pehswai, Chhatrapati Shivaji Maharaj, Dr. Babasaheb Ambedkar, Mahatma Jyotiba Phule, OBC Reservation, Mumbai Development
#LokneteDBPatil #AgriKoliBhandari #Sagarpurtra #LandRights #NaviMumbaiAirport #SocialJustice #Maharashtra #OBCRights #ChhatrapatiShivaji #BabasahebAmbedkar #JyotibaPhule #CommunityStruggle
ReplyReply allForward |

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: