उरणमध्ये सार्वजनिक ठिकाणी वाढत्या व्यसनाधीनतेविरोधात स्थानिकांचा एल्गार; महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
उरण, दि. २९ (प्रतिनिधी): उरण तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून, प्रशासनाचे यावर नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच, उरण तालुक्यातील अनेक ठिकाणी, विशेषतः सर्व्हिस रोडवर आणि सार्वजनिक जागांवर मद्यपी व व्यसनी लोक खुलेआमपणे दारू पित असून, मोठ्या प्रमाणात गांजा, अफू, चरस यांसारख्या अंमली पदार्थांचेही सेवन करत आहेत. यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
करळ फाट्यावर गंभीर परिस्थिती
उरणमध्ये ये-जा करण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या करळ फाट्यावर परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. जेएनपीटी प्रशासनाच्या सर्व्हिस रोडलगत मद्यपी आणि व्यसनी लोकांचा वावर वाढला आहे. या ठिकाणाहून गावातील महिला, शाळकरी मुले-मुली आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. संध्याकाळी ६ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत हे व्यसनी लोक गट करून रस्त्यावरच बसतात, दारू पितात आणि गांजा ओढतात. त्यांना कायदा किंवा प्रशासनाची कोणतीही भीती वाटत नाही, असा आरोप सोनारी, करळ आणि आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी केला आहे.
या व्यसनी लोकांकडून महिला आणि शाळकरी मुलींकडे वाईट नजरेने पाहिले जात असल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांना जीव मुठीत घेऊन आणि शरमेने मान खाली घालून प्रवास करावा लागत आहे. ही परिस्थिती वेळीच आटोक्यात आणली नाही, तर विनयभंग, चोरी, दरोडे, खून, बलात्कार यांसारख्या गंभीर घटनांना प्रोत्साहन मिळू शकते, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी द्रोणागिरी नोडमध्ये एका स्थानिक व्यक्तीवर परप्रांतीय व्यक्तीकडून चाकू हल्ला झाल्याची घटना घडली होती, तसाच प्रकार करळ फाट्यावरही होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली आहे.
ग्रामस्थांची प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी
सोनारी ग्राम सुधारणा मंडळ आणि ग्रामस्थांनी, तसेच महिला वर्गाने जेएनपीटी प्रशासन आणि न्हावा शेवा बंदर पोलीस प्रशासनाकडे याबाबत पत्रव्यवहार करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. करळ फाट्यावरील जेएनपीटीच्या सर्व्हिस रोड लगत बसणाऱ्या मद्यपी आणि व्यसनी लोकांवर कायमस्वरूपी कारवाई करून, एकाही व्यक्तीला तिथे बसू देऊ नये, अशी त्यांची मागणी आहे.
यावेळी सर्व्हिस रोडवर महिलांनी मोर्चा काढला होता. सोनारी ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष अजय म्हात्रे यांनी स्पष्ट केले की, "आमचा कोणालाही विरोध नाही, रोजीरोटीला विरोध नाही, कामधंद्याला विरोध नाही. आमचा विरोध फक्त रस्त्यावर व रस्त्याच्या आजूबाजूला बसणाऱ्या मद्यपी व गांजा, चरस ओढणाऱ्या व्यक्तींना आहे. हा विषय गावाच्या प्रतिष्ठेचा आणि महिलांच्या सुरक्षिततेचा असल्याने सर्वांनी सहकार्य करावे."
पोलीस प्रशासनाने या मद्यपींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी अजय म्हात्रे यांच्यासह ग्रामसुधारणा मंडळ, पंच कमिटी, महिला वर्ग आणि ग्रामस्थांनी जेएनपीटी प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
Uran, Karal Fata, Public Nuisance, Drug Abuse, Alcohol Consumption, Women Safety, JNPT Administration, Nhava Sheva Police, Community Complaint, Anti-Social Activities
#Uran #PublicSafety #DrugAbuse #Alcoholism #WomenSafety #CommunityProtest #MaharashtraPolice #JNPT #AntiSocialBehavior #KaralFata

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: