महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त रंगले कविसंमेलन

 

महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त निमंत्रित कवींचे संमेलन रंगले



प्राधिकरण, निगडी: पिंपरी चिंचवड साहित्य मंच आयोजित 'शब्दसंदवैभव' काव्य संमेलन भक्ती शक्ती जवळील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महात्मा बसवेश्वर उद्यान येथे प्रा. तुकाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. वीरशैव लिंगायत समाज, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, बसवेश्वर पुतळा समिती आणि मल्लिकार्जुन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दिमाखदार कविसंमेलनात विविध रंगाच्या, ढंगाच्या कवितांनी संमेलनास रंगत आणली.

निमंत्रित कवींनी वेगवेगळ्या विषयांवर आपली मौलिक रचना सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली. सविता इंगळे यांनी "माहेरचा सूर्य लाडिक वागतो, कोवळ्या किरणांनी हलकेच जागवतो, सासरच्या सूर्य भल्या पहाटे येई, दिस उगवायच्या आधी होते कामाची घाई" अशा ओळींतून महिला वर्गाच्या अनुभवांना वाचा फोडत श्रोत्यांचे मन जिंकले.

पीतांबर लोहार यांनी "आला आखाजीचा सण झोका झाडाले बांधू, पाय भूईवर ठेवून झेप आकाशात घेऊ" असे म्हणत अक्षय तृतीया अर्थात आखाजी सणाची खानदेशी अहिराणी बोलीभाषा ढंगातील गेय सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

शोभा जोशी यांनी "अंगणात भुंगा करतोया दंगा, गुण गुण गातो गाणी, गुण गुण गातो गाणी" या काव्यातून अंगणाचे चित्ररूप उभे केले. कैलास भैरट यांनी "प्रत्येक थेंब पाण्याचा जपायलाच हवा, उद्यासाठी जमिनीमध्ये साठवायला हवा" या ओळींतून पाण्याचे महत्त्व आपल्या कवितेतून सांगितले.

वंदना इन्नाणी यांनी "दाट भरावं आभाळ कोसळांव धरेवर, धारा झिम्माड, झिम्माड माझीच आस खरोखर" यातून पावसाची ओढ दाखविली. तर ज्येष्ठ कवी बाबू फिलीप डिसोजा यांनी महाराष्ट्र राज्य दिनानिमित्त "लावूनी बाजी प्राणांची वीरगती ज्यांनी पत्करली, होते दिलदार सरदार ते निष्ठावान राजांना" अशा शब्दांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची ओळख जागविली.

संयोजक कवी मा. राजेंद्र घावटे यांनी "फेकून द्या रे भेद गड्यांनो देश भारत समर्थ रहावा, विचार पेरूनी बंधुत्वाचा माझा भारत एक व्हावा" असे म्हणत भेदभाव दूर करण्याचे आवाहन केले. मराठी स्वरचित दोहे संस्थेचे अध्यक्ष  राज अहेरराव यांनी "साधू साधा शोध तू, नको टिळ्याची आस, पोपटपंची न कामी, व्यर्थ होई प्रवास" या दोह्याने श्रोत्यांना अंतर्मुख केले.

सूत्रसंचालिका सीमा शिरीष गांधी यांनी "अक्षरनगरीच्या सफरीत घडावे सारे मंगलमय, न उरावी असूया, न उरावे भय, मौनातल्या शब्दांचा ईश्वरास अर्थ कळावा... पुढला जन्म मात्र अक्षरांचाच मिळावा" अशा ओळींतून अक्षरांचे महत्त्व सांगितले. प्रथितयश हास्य कवी अनिल दीक्षित यांनी "पत्रात काय ते लिवा" म्हणत राजकारण्यांना बोचकारे काढले.

चंद्रकांत धस, मीना शिंदे, अरूण कांबळे, हेमंत जोशी, दत्तू ठोकळे, ज्योती देशमुख यांनीही आपल्या रचना सादर केल्या. काही कवींनी लावणी आणि पोवाडा प्रकारही सादर केला. कार्यक्रमाच्या समारोपात बसवेश्वर पुतळा समितीचे अध्यक्ष नारायण बहिरावडे आणि आयोजकांनी सर्व कवींचा यथोचित सन्मान केला.

.....................................

#MahatmaBasaveshwar 

#PoetryGathering 

#MarathiLiterature 

#PimpriChinchwad 

#BasaveshwarJayanti 

#ShabdSandVaibhav 

#CulturalEvent 

#VeerShaivLingayat 

#PoetryRecital 

#LiteraryGathering 

#MarathiCulture 

#PoetryFestival

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त रंगले कविसंमेलन महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त रंगले कविसंमेलन Reviewed by ANN news network on ५/०२/२०२५ ०५:४७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".