पुणे : मराठी लघुपट 'सुलतान'ने फ्रान्समधील प्रतिष्ठित टूलूज इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये प्रेक्षकांचा पसंतीचा पुरस्कार (ऑडिएन्स चॉइस अवॉर्ड) जिंकून मराठी चित्रपटसृष्टीचा झेंडा जागतिक पटलावर फडकवला आहे. लेखक-दिग्दर्शक अविनाश कांबीकर यांच्या या लघुपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले आणि त्याने आंतरराष्ट्रीय महोत्सवात आपला ठसा उमटवला.
'सुलतान'च्या यशाची गोष्ट त्याच्या साध्या, पण प्रभावी मांडणीवर आधारित आहे. अविनाश कांबीकर यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित या लघुपटाच्या माध्यमातून ग्रामीण वास्तव, माणसांची झुंज आणि सामाजिक विषमतेविरुद्धचा संघर्ष प्रभावीपणे सादर केला आहे.
टूलूज फिल्म फेस्टिव्हल २०२५ च्या दहाव्या आवृत्तीत भारतातील विविध भाषांतील दर्जेदार चित्रपटांचा समावेश होता. मात्र, 'सुलतान'ने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान मिळवले. या महोत्सवात प्रमुख परीक्षक म्हणून सारा जोगेट, रविंदर सिंग राणा, आणि पंकज शर्मा यांचा समावेश होता.
या महोत्सवाचे आयोजन आणि समन्वय व्हेनेसा बियांची (महोत्सव संचालिका), सारा लेगुएव्हॅक्स (सह-संयोजिका), आणि एलोडी हमिदोविक (महोत्सव समन्वयक) यांनी अत्यंत व्यावसायिक पद्धतीने केले. त्यांचे नेतृत्व आणि आयोजनामुळे हा महोत्सव एक नवा आदर्श ठरला.
प्रेक्षकांच्या अभिप्रायावर आधारित 'ऑडिएन्स चॉइस अवॉर्ड' जिंकणे हे फार महत्त्वाचे असते, कारण यामुळे कलाकृतीच्या भावनिक आणि सामाजिक प्रभावाचा प्रत्यय येतो. 'सुलतान'ने फक्त तांत्रिकदृष्ट्या नव्हे, तर भावनिक आणि सामाजिक पातळीवरही आपला ठसा उमटवला आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील या यशामुळे, अविनाश कांबीकर यांचा आगामी चित्रपट 'ग्रेझिंग लँड' हाही चर्चेत आला आहे. २०२६ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडे सिनेप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.
...........................................
#MarathiCinema
#Sultan
#ToulouseFilmFestival
#AudienceChoiceAward
#AvinashKambikar
#InternationalRecognition
#AnnaBhauSathe
#ShortFilm
#IndianCinemaAbroad
#RegionalFilmSuccess
#GrazingLand
#MarathiPride

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: