खेड बस स्थानकावरील उपाहारगृह दीड वर्षांपासून बंद; प्रवासी, कर्मचारी हैराण

 


खेड : उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू झा्ला असून खेड येथील एस.टी. बस स्थानक प्रवाशांनी गजबजलेले असतानाही, बस स्थानकातील उपाहारगृह अजूनही बंदच आहे. प्रशासनाकडून ठेकेदाराने भाडे थकवल्याचा कांगावा करत उपाहारगृहाला कुलूप लावलेले आहे. मात्र या संदर्भात माजी ठेकेदार आनंदराव टिळेकर यांनी वेगळीच बाजू मांडली आहे.

टिळेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले की, "मी कोणतेही भाडे थकवलेले नाही. उपाहारगृह चालवणे मला परवडत नव्हते, त्यामुळे मी एस.टी.चे उपाहारगृह दीड वर्षांपूर्वीच बंद केलेले आहे. तसा लेखी राजीनामा एस.टी. महामंडळाकडे सुपूर्द केलेला आहे."

टिळेकर पुढे म्हणाले की, "मी उपाहारगृह सोडल्यानंतर या ठिकाणी नवीन निविदा काढून एस.टी. उपाहारगृह चालवायला देणे आवश्यक होते. परंतु स्थानिक अधिकारी व कर्मचारी आपले भांडे उघडे पडेल म्हणून मी भाडे थकवले अशा पद्धतीने बोंबाबोंब करून माझी नाहक बदनामी करत आहेत."

गेल्या दीड वर्षापासून एस.टी.च्या उपाहारगृहाला लागलेले कुलूप अजूनही कायम आहे. याचा फटका विशेषतः सकाळच्या वेळेत येणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. सकाळच्या सुमारास अन्य हॉटेल व टपरी बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

उल्लेखनीय म्हणजे, गणेशोत्सवाच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात महिला बचत गटाला प्रवाशांच्या नाष्ट्याची सोय करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, गणेशोत्सव संपुष्टात आल्यानंतर उपाहारगृहातील बचत गटाचे बस्तान उठवण्यात आले. तेव्हापासून उपाहारगृह बंदच आहे.

याचा मोठा फटका एस.टी. बसच्या चालक-वाहकांसह अन्य कर्मचाऱ्यांनाही बसत आहे. प्रवासी आणि कर्मचारी यांची उपाहारगृहाअभावी होणारी ससेहोलपट सुरू असतानाही एस.टी. प्रशासन कोणतीही पर्यायी व्यवस्था करत नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जुने परवानाधारक आनंदराव टिळेकर यांनी असा आरोप केला आहे की, एस.टी.च्या आगारप्रमुखांसह अन्य अधिकाऱ्यांकडून त्यांची नाहक बदनामी सुरू आहे. या प्रकरणी त्यांनी एस.टी.च्या अधिकाऱ्यांविरुद्ध आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

प्रवाशांच्या गैरसोयीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना एस.टी. प्रशासनाने उपाहारगृह सुरू करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून होत आहे.

.........................................

#KhedBusStand  

#MSRTC  

#CanteenClosed  

#PassengerTrouble  

#STAdministration  

#MaharashtraTransport  

#PublicInconvenience  

#AnandraoTilekar  

#RatnagiriNews  

#KhedNews  

#BusStandIssues  

#STWorkers  

#TransportNews  

#CivicIssues  

#MaharashtraNews  

#STStrike  

#BusCanteen  

#TravelTroubles  

#UnservedPassengers  

#NeedImmediateAction


खेड बस स्थानकावरील उपाहारगृह दीड वर्षांपासून बंद; प्रवासी, कर्मचारी हैराण खेड बस स्थानकावरील उपाहारगृह दीड वर्षांपासून बंद; प्रवासी, कर्मचारी हैराण Reviewed by ANN news network on ५/०७/२०२५ ०१:२५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".