महाराष्ट्रात १००% इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींना मंजुरी
रत्नागिरी, दि. १३ मे २०२५: महाराष्ट्र शासनाने राज्यातील १ लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी टॅक्सी समुच्चयक (अॅग्रीगेटर) सेवेला मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक २०२५०४२११८१८३६५२२९ आहे.
नव्या दुचाकी टॅक्सी धोरणाची मुख्य वैशिष्ट्ये
दुचाकी टॅक्सी चालविण्यासाठी किमान ५० दुचाकी असणाऱ्या पात्र अर्जदारास राज्य परिवहन प्राधिकरणाकडून संपूर्ण राज्यासाठी एकच परवाना देण्यात येईल. हा परवाना पाच वर्षे वैध राहील. सर्व दुचाकी-टॅक्सी पिवळ्या रंगात रंगवून त्यावर 'बाईक-टॅक्सी' असे लिहिणे, तसेच सेवा प्रदात्याचे नाव व संपर्क क्रमांक लिहिणे बंधनकारक आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, दुचाकी-टॅक्सी समुच्चयक अंतर्गत अर्ज करणाऱ्या सर्व दुचाकी १००% इलेक्ट्रिक असणे अनिवार्य आहे. तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या तरतुदींनुसार चालकाकडे वैध परवाना व बॅज असणे आवश्यक आहे.
चालकांसाठी निकष आणि सुरक्षा उपाय
चालकाचे वय २० ते ५० वर्षांच्या दरम्यान असावे आणि त्यांना प्रतिदिन केवळ ८ तास दुचाकी चालविण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. सर्व चालकांना सेवा प्रदात्याकडून प्रशिक्षण देणे आवश्यक असून त्यांची पार्श्वभूमी तपासणीही बंधनकारक आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने, दुचाकी चालक केवळ एका प्रवाशाला घेऊन जाऊ शकेल. १२ वर्षांखालील मुलांना प्रवासाची परवानगी नसेल. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व बाईक टॅक्सींमध्ये प्रवाशी आणि चालक यांच्यामध्ये विभाजक बसविणे आवश्यक आहे. पावसाळ्यात चालक आणि प्रवाशी यांच्या सुरक्षेसाठी अच्छादन उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे.
"काही कालावधीनंतर महिला चालकांचे प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढवून ते ५० टक्के करण्याची जबाबदारी परवानाधारकांची राहील," असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
सेवेची मर्यादा आणि दर
प्रत्येक फेरीसाठी जास्तीत जास्त १५ किलोमीटर अंतराची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दुचाकी-टॅक्सीच्या दराचे नियंत्रण संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून केले जाईल. सर्व दुचाकी-टॅक्सी सेवा अॅप किंवा संकेतस्थळाद्वारे चालविण्यात येणार आहेत.
शासन निर्णयानुसार, परिवहनेतर दुचाकींच्या बाईक पुलिंगलाही परवानगी देण्यात आली आहे. या अंतर्गत परिवहनेतर दुचाकी चालकांना शहरांतर्गत प्रतिदिवशी ४ फेऱ्या आणि शहराबाहेर प्रतिदिवशी २ फेऱ्या अनुज्ञेय असतील.
शासन निर्णयात असेही म्हटले आहे की, केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अॅग्रीगेटर्स गाईडलाईन्स-२०२४ च्या मसुद्यावर अंतिम अधिसूचना आल्यानंतर त्यानुसार आवश्यक ते बदल किंवा सुधारणा करण्यात येतील.
महाराष्ट्र राज्यातील १ लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी टॅक्सी समुच्चयक सेवेबाबतची सविस्तर नियमावली लवकरच स्वतंत्रपणे प्रकाशित करण्यात येईल.
------------------------------------------
#BikeTexiMaharashtra
#ElectricMobility
#SustainableTransport
#UrbanCommute
#MaharashtraTransport
#WomenEmpowerment
#PublicTransport
#SafeTravel

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: