खुलासा आणि सुनावणीनंतरच पुढील निर्णय
पिंपरी (प्रतिनिधी) – कुदळवाडी व चिखली परिसरातील मशिदींना दिलेल्या अतिक्रमणाच्या नोटिशीवर तत्काळ कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहे. सर्वोच्च न्यायालय व राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेत, संबंधित पक्षांच्या खुलाशांवर संपूर्णपणे सुनावणी झाल्यानंतरच पुढील पावले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले.
महापालिकेच्या नोटिशींविरोधात ‘मज्जिद आणि मदरसा ॲक्शन कमिटी’च्या शिष्टमंडळाने आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली. या बैठकीत ॲक्शन कमिटीचे प्रतिनिधी राहुल डंबाळे, फजल शेख, शहाबुद्दीन शेख, नियाज सिद्दीकी, बाबा कांबळे, गुलजार शेख, युसुफ कुरैशी, मौलाना नय्यर नुरी, कारी इक्बाल उस्मानी, सय्यद गुलाम रसुल, याकुब शेख, रशिद सय्यद, शकुरुल्ला पठाण आणि वाहीद कुरैशी सहभागी होते. बैठकीला पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक देखील उपस्थित होते.
शिष्टमंडळाने महापालिकेच्या नोटिशींवर नाराजी व्यक्त केली व नमूद केले की संबंधित मशिदी खासगी जमिनीवर उभारण्यात आल्या असून, त्या राज्य शासनाच्या धोरणानुसार नियमित करण्यास पात्र आहेत. त्यांनी शासनाकडे दाखल केलेल्या प्रस्तावांची माहिती दिली व मुंबई, नागपूर, मीरा-भाईंदर, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील उदाहरणे देत, पिंपरीतील मशिदीही नियमित करण्यात याव्यात, अशी मागणी केली.
या पार्श्वभूमीवर आयुक्त सिंह यांनी शिष्टमंडळाला समजून घेत, कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले. तसेच, नियमितीकरणाबाबत महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांच्याशी संपर्क साधावा, अशी सूचना केली.
शिष्टमंडळाने एकतर्फी कारवाई न करण्याचा इशारा देत सांगितले की, अशा कारवायांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याऐवजी न्यायालयीन प्रक्रिया, शासन धोरण आणि खुलाशांची पूर्ण सुनावणी झाल्यानंतरच निर्णय घेण्याची मागणी केली.
दरम्यान, अतिक्रमणाची नोटीस मिळालेल्या पाच मशिदींवर छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ ट्रिब्युनल बोर्डाने स्थगिती दिली आहे, हेही शिष्टमंडळाने बैठकीत निदर्शनास आणले. त्यामुळे महापालिकेच्या आगामी कारवायांची दिशा आता न्यायालयीन व कायदेशीर प्रक्रियेवर अवलंबून राहणार आहे.
Reviewed by ANN news network
on
५/१४/२०२५ ०१:१८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: