लोणावळा – पावसाळा तोंडावर आला असताना लोणावळा शहरात नागरिक आणि पर्यटकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पावसाळापूर्व कामांना गती द्या, असे स्पष्ट आदेश मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी नगरपरिषदेला दिले आहेत. नालेसफाई, रस्त्यांची डागडुजी, वाहनतळाची उभारणी, भूशी डॅमकडे जाणाऱ्या रस्त्याचे सुशोभीकरण, अशा अनेक कामांचा त्यांनी आढावा घेतला.
खासदार बारणे यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा शहरातील विकासकामांची आढावा बैठक मंगळवारी पार पडली. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, शिवसेनेचे शरदराव हुलावळे, राजाभाऊ खांडभोर, संजय भोईर, सुरेखा जाधव, मनिषा भांगरे, आरपीआयचे सूर्यकांत वाघमारे, श्रीधर पुजारी, दत्ताभाऊ केदारी, विशाल हेलावळे, नितीन देशमुख, भाजपा शहराध्यक्ष अरुण लाड, नाजीर शेख, नारायण पाळेकर, विशाल पठारे, सिंधुताई परदेशी, कल्पनाताई आखाडे, मनसेचे निखिल भोसले, प्रकाश पठारे, मंगेश येवले, विजय आखाडे, सुनील तावरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, “लोणावळ्यात पावसाचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे शहरात कुठेही पाणी साचून राहू नये, यासाठी नालेसफाई तातडीने पूर्ण करावी. रस्त्यांची डागडुजी करून सुरक्षितता वाढवावी. पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन वाहनतळ विकसित करावे आणि त्यासाठी लागणाऱ्या जागांचे भूसंपादन त्वरित करावे.”
ते पुढे म्हणाले की, “भूशी डॅमकडे जाणाऱ्या मार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे ३.१४ कोटींचे काम सध्या ४० टक्के पूर्ण झाले असून ते अधिक वेगाने पूर्ण करावे. लोणावळा भाजीपाला मार्केटमध्ये मल्टीपर्पज वाहनतळासाठी नगरविकास विभागाकडून सहाय्य मिळवता येईल.”
खासदारांनी वल्हवन तलाव आणि खंडाळा उद्यानाच्या सुशोभीकरणाच्या कामालाही गती देण्याचे निर्देश दिले. पर्यटकांमुळे वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले. लोणावळ्यातून वाहणारी इंद्रायणी नदी स्वच्छ करावी व नदीतील जलपर्णी काढून टाकावी, अशी सूचना त्यांनी दिली.
“रेल्वे पोल क्रमांक ३० आणि ३२ येथे दोन पूल उभारण्यात येणार असून त्यासाठी भूसंपादनाचे काम दोन महिन्यांत पूर्ण झाले पाहिजे,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले. सर्व पावसाळापूर्व कामांची लेखी माहिती १५ दिवसांत सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
......................................
#Lonavala
#SrirangBarne
#MonsoonPrep
#BhushiDam
#TourismDevelopment
#MunicipalityWork
#NalaCleaning
#RoadRepair
#MaharashtraNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: