दापोली : दापोली तालुक्यातील हर्णे बायपास रोड जवळील निसर्ग हॉटेल समोरील समुद्रकिनारी असलेल्या दगडात आज दुपारी अंदाजे 5 ते 6 किलो वजनाचा व्हेल माशाच्या उलटीसारखा पदार्थ आढळून आला आहे. दापोली पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून हा पदार्थ ताब्यात घेतला असून, तो व्हेल माशाचीच उलटी असल्याबाबत खातरजमा करण्यासाठी नागपूर येथील वनविभागाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती वनाधिकारी यांनी दिली आहे.
हर्णे येथील सामाजिक कार्यकर्ते वाजीद खान यांनी हा संशयास्पद पदार्थ प्रथम पाहिला. त्यांनी निसर्ग हॉटेल समोरील समुद्रकिनारी असलेल्या दगडात व्हेल माशाच्या उलटीसारखा पदार्थ दिसून आल्याची माहिती आज दुपारी पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी ही माहिती पत्राद्वारे वनविभागाला कळवली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख, उपनिरीक्षक राजकुमार यादव, परीक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील व त्यांचे सहकारी दुपारी 2.30 च्या सुमारास हर्णे समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले. त्यांना हा उलटीसदृश्य पदार्थ दगडात अडकलेल्या स्थितीत आढळून आला. पदार्थाला मोठ्या प्रमाणात वाळू चिकटलेली होती. त्यामुळे तो पदार्थ धुवून, त्याचा पंचनामा करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर पदार्थ हा व्हेल माशाची उलटी असल्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे. त्याची निश्चित खात्री करण्यासाठी सदर पदार्थ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती परीक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली आहे. वैज्ञानिक तपासणीनंतरच या पदार्थाचे नेमके स्वरूप समजू शकेल, असे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.
........................................
#Dapoli
#WhaleVomit
#Ambergris
#MarineDiscovery
#HarneBeach
#ForestDepartment
#MarineScience
#RatnagiriNews
#CoastalMaharashtra
#WildlifeNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: