दहशतवादाचा खात्मा: ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 हून अधिक अतिरेकी ठार
पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण
नवी दिल्ली - "पाहलगाम दहशतवादी हल्ला: न्याय झाला आहे. जय हिंद. - ऑपरेशन सिंदूर." काल रात्री 1:51 वाजता भारतीय सेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केलेल्या या एका वाक्याने संपूर्ण देशात गर्वाची लाट उसळली. भारताने पुन्हा एकदा दाखवून दिले की आपल्यावर हल्ला करणाऱ्यांना कठोर उत्तर दिले जाईल – आणि ते त्यांच्या स्वतःच्या भूमीत घुसून.
ही केवळ भावनिक प्रतिक्रिया नव्हती, तर काटेकोर नियोजन आणि रणनीतीची फलनिष्पत्ती होती. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) नऊ दहशतवादी तळांवर लक्ष्य साधून त्यांचा पूर्णपणे नाश करण्यात आला. बहावलपूर, अहमदपूर ईस्ट, कोटली आणि मुजफ्फराबाद या प्रमुख भागांमध्ये ही कारवाई केली गेली. विशेष म्हणजे हे तळ लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांचे होते - जे हाफिज सईद आणि मसूद अझहर यांसारख्या कुख्यात दहशतवाद्यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत होते.
सैन्याने स्पष्ट केले आहे की कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळावर हल्ला करण्यात आलेला नाही. फक्त दहशतवादी गटांच्या केंद्रावर लक्ष्य केंद्रित केले गेले. अंदाजे 100 अतिरेकी या कारवाईत ठार झाले असून आणखी 72 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
लक्षणीय म्हणजे, यावेळी पाकिस्तानकडूनही हल्ल्याचे पुरावे जगासमोर आले. पूर्वी भारताच्या कारवाईवर 'पुरावे कुठे आहेत?' असा प्रश्न विचारणाऱ्यांना यावेळी स्वतः पाकिस्तानमधूनच व्हिडिओ फुटेज उपलब्ध झाले आहे. यावरून स्पष्ट होते की भारताची कारवाई केवळ कठोरच नव्हे तर संपूर्ण माहितीवर आधारित आणि अचूक होती.
या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये संपूर्ण भीतीचे वातावरण पसरले आहे. लाहोर आणि सियालकोट विमानतळ 48 तासांसाठी बंद करण्यात आले आहेत - जणू आणीबाणीच लागू केली गेली आहे. याशिवाय, पाकिस्तानमधील बलोच बंडखोरांनी दोन स्वतंत्र हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराचे 14 सैनिक ठार केल्याचीही माहिती मिळाली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सकाळी 10 वाजता यासंदर्भात एका तातडीच्या बैठकीचे आवाहन केले आहे. मात्र भारताने आधीच आपल्या कारवाईतून दाखवून दिले आहे की निर्णय आणि अंमलबजावणी यामध्ये वेळ वाया घालवायचा नसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण ऑपरेशनवर स्वतः नजर ठेवली होती आणि देशाला फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे.
या ऑपरेशनमध्ये 'लॉइटरिंग म्युनिशन' (सुसाइड ड्रोन) चा वापर झाल्याचेही समोर आले आहे, ज्यामुळे अत्यंत अचूकतेने लक्ष्य भेदण्याची क्षमता दाखवली गेली. याशिवाय भारतीय नौदलाचेही सहकार्य होते.
पाकिस्तानी माध्यमांपैकी काही या हल्ल्याला सामान्य नागरिकांवरील हल्ला म्हणून चित्रित करत आहेत, परंतु हे पूर्णपणे असत्य आहे. भारतीय सेना केवळ दहशतवादी आणि त्यांच्या गुप्त तळांवरच हल्ले करते, याबद्दल विश्वास ठेवण्याचे आवाहन संरक्षण मंत्रालयाने केले आहे.
या दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही प्रतिक्रिया दिली – "It's a shame. We just heard about it." त्यांनी या क्षेत्रातील चालू संघर्षाकडे लक्ष वेधले आहे.
या सर्व घडामोडींमध्ये महत्त्वाचे म्हणजे, माहितीच्या युद्धात चुकीची माहिती पसरवणे हे शत्रूचे एक शस्त्र आहे. त्यामुळे नागरिकांनी फक्त अधिकृत स्त्रोतांकडूनच माहिती घेणे, अफवा पसरवू न देणे, आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
भारताने दाखवून दिले आहे की 'बदला' म्हणजे काही ऍपवर मागवलेले फास्ट फूड नसते – हे युद्ध आहे, आणि युद्ध आपली सेना आपल्या अटींवर लढते.
========================
#OperationSindoor
#IndianArmy
#CounterTerrorism
#POK
#PahalgamAttack
#LashkarETaiba
#JaishEMohammad
#IndianDefense
#SurgicalStrike
#JaiHind

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: