चिखलीत लेबर कॅम्पमधील बेकायदा दारू अड्डा उध्वस्त!
परिसरातील सोसायटीधारकांना दिलासा, आमदार महेश लांडगे यांची पोलिसांना सूचना
पिंपरी : चिखली येथील होरायझन आणि लिगसी रिव्हरसाईड सोसायट्यांच्या मागे असलेल्या एका मोठ्या लेबर कॅम्पमध्ये देशी दारूचा बेकायदा अड्डा सुरू होता. जवळपास तीन हजाराहून अधिक मजुरांचे वास्तव्य असलेल्या या कॅम्पमध्ये बिनधास्तपणे चालणाऱ्या दारू विक्रीमुळे परिसरात सतत तणावाची व धोकादायक परिस्थिती निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भाजपा आमदार महेश लांडगे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत या अड्ड्यावर छापा टाकून तो उध्वस्त केला.
या कारवाईमुळे परिसरातील सोसायटीधारकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. बेकायदेशीर दारू अड्ड्यामुळे सतत वादविवाद, अपशब्द, महिलांवर अश्लील वर्तन आणि दगडफेकीसारख्या घटना घडत होत्या. अनेक वेळा मद्यधुंद अवस्थेतील मजूर सोसायटीच्या आवारात उपद्रव करत असल्याने महिलांसह लहान मुलांनाही घराबाहेर पडणे अवघड झाले होते.
दारू विक्रीतून वाढलेली असुरक्षितता
या लेबर कॅम्पमध्ये नियमितपणे देशी दारू विक्री होत होती. त्यामध्ये येणाऱ्या व ग्राहक म्हणून बसणाऱ्या मजुरांमुळे परिसरात गैरवर्तन व वादाचे प्रसंग वाढले. सोसायटींच्या सुरक्षारक्षकांकडूनही वारंवार पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र पोलिसांनी नुकतीच तातडीने दखल घेऊन ही धडक कारवाई केली.
बांगलादेशी घुसखोरीचा संशय
या प्रकरणातील अधिक चिंताजनक बाब म्हणजे या लेबर कॅम्पमध्ये बांगलादेशी घुसखोर मजूर असल्याचा संशयही स्थानिकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांनी पोलिसांकडे मागणी केली आहे की, या कॅम्पमधील प्रत्येक मजुराचे ओळखपत्र तपासले जावे आणि पोलीस सत्यापन केले जावे.
पोलिसांकडून सर्च ऑपरेशनची मागणी
रहिवाशांचे म्हणणे आहे की, या परिसरात असलेल्या हजारो मजुरांमध्ये कोण कोण आहे हे स्पष्ट नाही. त्यामुळे भविष्यात कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी याठिकाणी 'सर्च ऑपरेशन' राबवावे व विदेशी घुसखोर असल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी.
आमदार महेश लांडगे यांची प्रतिक्रिया
"नागरी मध्यवस्तीत, सोसायटीच्या आवारात दारूचे दुकान असल्यास नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याबाबत राज्य विधिमंडळात निर्णय झाला. त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार दारु दुकाने काही दिवसांपूर्वी ‘सील’ करण्यात आली होती. आता मजुरांच्या लेबर कॅम्पमध्ये बेकायदेशीर दारू अड्डा चालवला जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात आली. या लेबर कॅम्पमध्ये बांगलादेशी घुसखोर असण्याची शंका स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. त्याबाबतही पोलिसांमार्फत सर्च ऑपरेशन करण्याची मागणी केली आहे."
— महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड
.................................
#IllegalLiquor
#ChikhaliRaid
#PimpriChinchwadNews
#MaheshLandge
#LabourCamp
#PoliceAction
#BangladeshiInfiltration
#HousingSafety
#LocalNews
#MaharashtraNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: