पुणे : वैकुंठ स्मशानभूमीत दशक्रिया विधीसाठी आलेल्या नातेवाईकांना एक अस्वस्थ करणारा प्रसंग अनुभवास आला. मृत व्यक्तीच्या पिंडावर कावळ्याचा प्रतीकात्मक स्पर्श होण्याऐवजी कबुतरांच्या झुंडी ताव मारताना दिसल्या. या प्रकारामुळे धार्मिक श्रद्धा व विधीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दशक्रिया विधी दरम्यान पिंडावर कावळा बसल्यास तो काकस्पर्श मानला जातो आणि त्यातून मृत व्यक्ती किंवा पूर्वजांनी अन्न ग्रहण केल्याचे प्रतीत होते. मात्र, पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत कावळ्यांऐवजी कबुतरांनी मोठ्या संख्येने खाद्य पदार्थांवर ताव मारल्याचे निदर्शनास आले.
क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी या घटनेबाबत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांना निवेदन पाठवले असून, या बाबतीत वनविभाग व पक्षी तज्ज्ञांशी चर्चा करून ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे. विशेषतः कबुतरांच्या "कलिंग" संदर्भात गांभीर्याने विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
"कलिंग" म्हणजे कळपातील जनावरे फार वाढू नयेत म्हणून काही जनावरांचे नियोजनबद्धरीत्या निर्मूलन करणे. कबुतर हे संरक्षित प्रजातीतील पक्षी नसल्याने त्यावर असे उपाय योजण्याचा विचार करता येऊ शकतो, असे मत त्यांनी निवेदनात मांडले आहे.
पुणे महापालिकेने यापूर्वी कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, स्मशानभूमीसारख्या धार्मिक व भावनिक ठिकाणी देखील कबुतरांचा वाढता त्रास ही चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळे यावर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
...............................................
#PuneNews
#KabutarIssue
#DashkriyaRitual
#CrowSymbolism
#PMCAction
#VaikunthCrematorium
#SandeepKhardekar
#KakSparsha
#PigeonMenace
#MarathiNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: