मुंबई, १३: सर जे. जे. रुग्णालयातील सुपरस्पेशालिटी रुग्णालय बनवण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. या रुग्णालयात अनेक वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने गरजू रुग्णांना त्याचा लाभ मिळेल, असे त्या म्हणाल्या. ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले.
राज्यमंत्री मिसाळ यांनी आज सर जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली आणि आढावा बैठक घेतली. यावेळी सचिव धीरज कुमार, आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. अजय चांदनवाले, अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार, अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
मिसाळ यांनी हृदयरोग विभाग, मेंदू शल्यक्रिया विभाग, जनरल सर्जरी विभाग, अतिदक्षता विभाग आणि नर्सिंग होम यांसारख्या विविध विभागांना भेट दिली. रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक उपकरणांची माहिती घेतली. डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण, रिक्त पदांची भरती आणि डॉक्टरांसाठी निवास व्यवस्था यावरही त्यांनी चर्चा केली. रुग्णालयातील अन्न गुणवत्ता, स्कॅनिंग सुविधा, ऑपरेशन थिएटर आणि शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य उपलब्धता यांचाही आढावा घेतला. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत सुविधा देण्यावर त्यांनी भर दिला.
सर जे. जे. रुग्णालय हे १८० वर्षे जुने असून एक प्रतिष्ठित संस्था आहे. या रुग्णालयाच्या विकासासाठी सुरू असलेले सुपरस्पेशालिटी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्री मिसाळ यांनी दिले.
---------------------------------------------
#JJHospital
#SuperSpecialtyHospital
#Healthcare
#Mumbai
#Maharashtra
Reviewed by ANN news network
on
५/१४/२०२५ ०१:२६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: