गणेश कला क्रीडा मंच येथे बाल पुस्तक जत्रेचे २२ ते २५ मे दरम्यान आयोजन
पुणे - उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना वाचनाची गोडी लागावी, इतिहास, कला, साहित्य आणि संस्कृतीची माहिती मिळावी, तसेच लेखन-आकलन कौशल्ये वाढावी, यासाठी पुणे बाल पुस्तक जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही जत्रा २२ ते २५ मे दरम्यान गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे होणार आहे.
या जत्रेत लहान मुलांसोबत पालक आणि शिक्षकांसाठी विविध कार्यक्रम, उपक्रम, परिसंवाद आणि कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच, मुलांना खाऊगल्लीत चमचमीत पदार्थांचा आनंद घेता येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय पुस्तक न्यासचे विश्वस्त आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पांडे म्हणाले, "राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांना साहित्याची ओळख व्हावी आणि ते चांगले वाचक घडावेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत."
या जत्रेत मराठी बाल आणि कुमार साहित्याचे भव्य प्रदर्शन, बाल साहित्य लेखन स्पर्धा, मुलांचे कविसंमेलन, पपेट शो, पथनाट्य कार्यशाळा, लेखक तुमच्या भेटीला, जादूचे खेळ आणि प्रशिक्षण असे अनेक विनामूल्य उपक्रम होणार आहेत.
या जत्रेत मुलांना विमान बनवायला शिकवणारी विमान विज्ञान कार्यशाळा, सागरगोट्या, विटी-दांडू यांसारख्या अंगण खेळांचा 'आपले अंगण' उपक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख करून देणारा 'मावळा खेळ' हे विशेष आकर्षण असणार आहेत.
पालक आणि शिक्षकांसाठीही बालसाहित्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त पुणेकरांनी या जत्रेला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
----------------------------------------
#PuneBalPustakJatra
#ChildrensBookFair
#Pune
#KidsEvents
#MarathiLiterature
#SummerVacation
Reviewed by ANN news network
on
५/१४/२०२५ ०२:१२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: