कोकणवासीय मराठा समाजाचा मानवतावादी उपक्रम; ५९ कुटुंबांना दिवाळी फराळ
पुणे - कोकणवासीय मराठा समाज पुणे आणि पिंपरी चिंचवड शाखेने एका विशेष सामाजिक उपक्रमाअंतर्गत समाजातील दुःखी कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप केले. यंदाच्या वर्षी ज्या कुटुंबांमध्ये नुकतेच मृत्यू झाले आहेत, अशा ५९ कुटुंबांपर्यंत हा फराळ पोहोचवण्यात आला.
समाजातील परंपरेनुसार कुटुंबात मृत्यू झाल्यानंतर साधारणपणे एक वर्षभर कोणताही सण साजरा केला जात नाही. या पार्श्वभूमीवर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अशा कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने हा उपक्रम राबवला.
संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष कृष्णा मोरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष आणि संपर्क प्रमुखांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. विभागवार मयत सदस्यांची यादी तयार करणे आणि फराळ वाटपाची जबाबदारी सर्वांनी समान पातळीवर पार पाडली.
या उपक्रमात श्री. कृष्णा कदम, श्री. दत्ता जाधव, श्री. रमेश मोरे, श्री. अनिल आप्पाजी मोरे, श्री. संजय सकपाळ, श्री. विनोद चव्हाण, श्री. संदिप सांवत, श्री. दत्ता मोरे (गुरुजी), श्री. शंकर मोरे, श्री. नंदू चव्हाण आणि श्री. सतीश मोरे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
समाजातील सर्वच स्तरांतून या मानवतावादी उपक्रमाचे विशेष कौतुक होत असून, अशा प्रकारच्या सामाजिक कार्याला मिळणारा प्रतिसाद पाहता भविष्यातही असे उपक्रम राबवले जाणार असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: