महाराष्ट्राचा कला इतिहास पुढे यावा: गिरीश प्रभुणे
पुणे: ज्येष्ठ शिल्पकार, चित्रकार आणि अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिनकर शंकर थोपटे हे ८५ व्या वर्षात पदार्पण करीत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आणि शिष्यपरिवाराने आयोजित केलेल्या ‘कला साधना’ या चित्र-शिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे आणि पंकज भांबुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये:
थोपटे यांच्या कार्यावर आधारित ‘शिल्प साधना’ या पुस्तकाचे प्रकाशन २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता झाला. हे चित्र-शिल्प प्रदर्शन पुण्यातील घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २० ते २४ नोव्हेंबर २०२४ दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
या प्रदर्शनात महाकवी कालिदासांच्या साहित्यावर आधारित पेंटिंग्ज आणि थोपटे यांच्या अद्वितीय शिल्पकला सर्वांना पाहता येणार आहेत. महाकवी कालिदासांच्या ‘अभिज्ञानशाकुंतलम’ या नाटकातील वर्णन त्यांनी चित्रमालिकेत साकारले आहे. त्यांच्या चित्रांमध्ये काव्यात्मक ग्रंथाचे वाचन आणि काही भाषांतरीत साहित्याचा आधार घेतला आहे.
सत्कार आणि भाष्य:
उद्घाटनानंतर पंकज भांबुरकर यांनी ‘कालिदासीय साहित्य आणि दृश्यकला’ या विषयावर भाष्य केले. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे थोपटे यांचा सत्कार करण्यात आला. क्षितिज प्रकाशनाद्वारे सुरेखा थोपटे यांनी ‘शिल्पसाधना’ या पुस्तकाची निर्मिती केली असून, स्वाती जरांडे यांनी या पुस्तकाचे शब्दांकन केले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन:
या प्रदर्शनाच्या संयोजन समितीत शिल्पकार दीपक थोपटे, संतोष पवार, बापू झांजे, विभूषण झांजे, देवदत्त बलकवडे, विशाल काळे, चेतन भोसले, स्वाती जरांडे, कनिष्का थोपटे आणि सुरेंद्र कुडपणे यांनी योगदान दिले. प्रसाद भारदे आणि सौ. अनिता देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले, तर बापू झांजे यांनी आभार मानले.
प्रमुख व्यक्तींची उपस्थिती:
जयप्रकाश जगताप, प्रा. पवार, मंगेश जेजुरीकर, डॉ. प्रसाद खंडागळे, विवेक खटावकर, शिवराज कदम-जहागीरदार, माधुरी कासट, परेश गरुड, राजेंद्र बलकवडे, राजीव अगरवाल, सदानंद जेजुरीकर, कैलास सोनटक्के, राजेंद्र थोपटे, प्रा. टाक, ज्ञानेश्वर मोळक हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
गिरीश प्रभुणे यांचे अध्यक्षस्थानावरून प्रतिपादन:
गिरीश प्रभुणे यांनी आपल्या भाषणात म्हटले, “कलेची साधना करणाऱ्या कलाकाराचा हा गौरव आहे. भारतीय परंपरेचा गौरव त्यांनी कलेतून केला आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले, खेडयापाड्यातून कलाकार उभे राहात आहेत, ही प्रेरणादायक बाब आहे. पिढ्या उभ्या राहात आहेत, गुरुकुल परंपरा चालवून ३ पिढ्यांना त्यांनी प्रेरणा दिली. महाराष्ट्राचा कलेचा इतिहास पुढे आणण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन करावे.”
रामदास फुटाणे यांचे मत:
रामदास फुटाणे यांनी म्हटले, “समाजात राजकारण्यांचे आणि सिनेकलाकारांचे कौतुक होते, पण शिल्पकार आणि चित्रकारांचे कौतुक होत नाही. थोपटे यांना पद्मश्री मिळाली नाही, ही खंत आहे. पुतळा उभारणीमध्ये भ्रष्टाचार होत आहे, यावरून महाराष्ट्राची दिशा समजते.”
थोपटे यांचे मनोगत:
प्रा. दिनकर थोपटे यांनी आभार मानताना सांगितले, “कलाकाराला शिकताना प्रारंभी घरातून फार पाठिंबा नसतो. हा प्रवास खडतर आहे. कलेत केलेल्या कार्याचा आदर म्हणून मला सन्मानित करण्यात आले, त्याबद्दल मी आभारी आहे.”
दिनकर थोपटे यांची कामगिरी:
अभिनव कला महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक शिल्पकार आणि चित्रकार घडवले. १९९७ ते २००० पर्यंत पुण्यातील टिळक रोडवरील अभिनव कला महाविद्यालयात ते प्राचार्य पदावर होते. फायबर ग्लास माध्यमातून शिल्प साकारताना त्यांनी विविध प्रयोग केले. त्यांची सर्व शिल्प वास्तववादाशी निगडित असून त्यात नववास्तववादाची जोड आहे.त्यांना अनेक राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत. १९९६ मध्ये त्यांच्या प्रवासी शिल्पाला ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. २०११ मध्ये त्यांना महाराष्ट्रातील श्रेष्ठ शिल्पकार म्हणून गौरविण्यात आले आहे.
हे प्रदर्शन सर्व कलेच्या प्रेमींनी आणि विद्यार्थ्यांनी नक्कीच पाहावे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: