पुणे : पुण्यातील चंदननगर येथे नदीपात्रात २६ ऑगस्ट रोजी एक शीर आणि हात, पाय नसलेले महिलेचे धड सापडले होते. मृत महिलेची ओळख पटवून तिच्या खुनाच्या गुन्ह्याचे कोडे उलगडण्याचे आव्हान पुणे पोलिसांसमोर होते. पोलिसांनी मोठ्या चिकाटीने तपास करून ते उलगडले आहे. मृत महिलेच्या सख्ख्या भावाने आपल्या पत्नीच्या मदतीने तिची क्रूरपणे हत्या केल्याचे समोर आले आहे.
सकिना अब्दुल खान (वय ४८, रा. शिवाजीनगर, पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या हत्येच्या आरोपावरून पोलिसांनी तिचा भाऊ अशपाक अब्दुल खान (वय ५१) आणि त्याची पत्नी हमिदा अशपाक खान (वय ४५) यांना अटक केली आहे.
मृत सकिना शिवाजीनगर, पाटील इस्टेट भागात एका खोलीत रहात होती. ती खोली तिच्या नावावर होती. अशपाक याला ती खोली हवी होती. तो आणि त्याची पत्नी सकिनाला त्या खोलीतून निघून जाण्यास सांगत होते. मात्र, ती निघून न गेल्याने अशपाक आणि त्याच्या पत्नीने २६ ऑगस्ट रोजी पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फायदा घेत त्यांनी घरातच धारदार शस्त्राने सकिनाची हत्या केली. मृतदेहाचे तुकडे करून ते संगमवाडी येथील नदीपात्रात फेकून दिले. सकिना बेपत्ता असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. अशपाकने सकिना गावाला गेल्याचे सांगितले, परंतु एका शेजाऱ्याला संशय आला.शेजाऱ्याने शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अशपाकची चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.पुणे पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: