मुंबई: परदेशात नोकरी मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून देशभरातील बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. कृष्णा कमलाकांत त्रिपाठी (वय ५२) असे या आरोपीचे नाव असून, त्याने बनावट एम्लॉयमेंट ऑफिस चालवून अनेक तरुणांना फसवले होते.
कृष्णा त्रिपाठी याने मुंबईतील अंधेरी (पूर्व) येथील पश्चिम द्रुतगती मेट्रो स्टेशनजवळ, सुमीत बिझनेस बेच्या ९ व्या मजल्यावर 'E AXIS IMMIGRATION SERVICES PVT. LTD.' या नावाने एक बनावट कंपनी सुरू केली होती. या कंपनीच्या माध्यमातून त्रिपाठीने परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून गरजू तरुणांकडून मोठी रक्कम उकळली. मात्र, त्यांना दिलेली वर्क परमिट लेटर्स बनावट असल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेल्या एका तरुणाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेकडे सोपवला. गुन्हे शाखेच्या पथकाने ३० ऑगस्ट रोजी कंपनीच्या कार्यालयावर छापा मारला. या छाप्यात ४५ व्होडाफोन सिमकार्ड्स, १० जिओ सिमकार्ड्स, ८ लॅपटॉप्स, १ डेस्कटॉप, २ मोबाईल फोन्स, २ बनावट स्टॅम्प, १ लाख २२ हजार रुपये रोख, व्हिजीटिंग कार्ड्स व इतर महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली. तसेच, आरोपी त्रिपाठी याला तात्काळ अटक करण्यात आली.
या कार्यवाहीचे नेतृत्व कक्ष-८ चे प्रभारी निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांनी केले. या कामगिरीत निरीक्षक श्रीकांत इंगवले, सहायक निरीक्षक मनोजकुमार प्रजापती, मधुकर धुतराज, संग्राम पाटील, राहुल प्रभू, उपनिरीक्षक अरविंद मोरे, विकास मोरे, सहायक उपनिरीक्षक शिरसाट, हवालदार यादव, कांबळे, शिपाई रहेरे, सटाले आणि बिडवे यांचा सहभाग होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: