पुणे महानगरपालिकेची पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सज्जता; ४२ बांधीव व २६५ ठिकाणी ५६८ लोखंडी टाक्यांची व्यवस्था
पुणे: श्री गणेशोत्सव २०२४ च्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी व्यापक तयारी केली आहे. ७ ते १७ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या उत्सवादरम्यान नैसर्गिक स्रोतांचे संरक्षण करत सार्वजनिक आरोग्य राखण्यावर पालिकेचा भर असणार आहे.
पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण ४२ बांधीव हौद आणि २६५ ठिकाणी ५६८ लोखंडी टाक्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. या ठिकाणी मूर्ती विसर्जनाची सोय उपलब्ध असेल.
पालिका आयुक्तांनी नागरिकांना कृत्रिम हौदांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्र, तलावांमध्ये निर्माल्य टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत सोशल मीडिया, VMDs, होर्डिंग्ज, बॅनर्स आणि पोस्टर्सद्वारे जनजागृती मोहीम राबवली जात आहे.
निर्माल्य संकलनासाठी २५६ कलश/कंटेनरची व्यवस्था करण्यात येणार आहे. निर्माल्यामध्ये फक्त हार, पाने, फुले टाकावीत. प्लास्टिक, थर्माकॉल, कापडी वस्तू, तसबिरी किंवा खाद्यपदार्थ टाकू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.
पुनर्वापर उपक्रमांतर्गत ECOEXIST संस्था, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था आणि इतर स्वयंसेवी संस्थांमार्फत शाडूची माती संकलित करून तिचा पुनर्वापर केला जाणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती www.punaravartan.org या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.
वाघोली येथील खाणीमध्ये तीन पाळ्यांमध्ये संकलित मूर्तींचे पुनर्विसर्जन करण्यात येणार आहे. या ठिकाणी जीवरक्षक आणि सुरक्षा रखवालदारांची नियुक्ती केली जाणार आहे.
नागरिकांना मूर्तीदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी भूमी ग्रीन संस्थेमार्फत १५,००० बॅग (प्रत्येकी ३ किलो) सेंद्रिय खत विसर्जन हौदांजवळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पालिकेने सार्वजनिक स्वच्छता राखण्याच्या सूचना दिल्या असून, आवश्यकतेनुसार मोबाईल टॉयलेटची व्यवस्थाही केली जाणार आहे. तसेच अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे
उपआयुक्त संदीप कदम यांनी सांगितले की, "आम्ही नागरिकांना पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करत आहोत. कृत्रिम हौदांचा वापर, निर्माल्य व्यवस्थापन आणि शाडू मातीचा पुनर्वापर यावर भर देत आहोत. नागरिकांच्या सहकार्यातूनच आपण हा उत्सव अधिक पर्यावरणस्नेही बनवू शकतो."

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: