नवी मुंबई: उलवे नोडमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या अकार्यक्षमतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाने "तिरडी उठाव" आंदोलनाची घोषणा करत सिडकोला इशारा दिला आहे.
उलवे सेक्टर ६ जवळील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प केवळ १०% क्षमतेने कार्यरत असल्याने परिसरात प्रदूषण व दुर्गंधीचा प्रश्न बिकट झाला आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून डेंग्यू आणि मलेरियासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मनसेने या समस्येबाबत वारंवार सिडको प्रशासनाकडे तक्रारी केल्या, परंतु कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आता पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मनसेच्या रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक गावकरी आणि उलवे नोडमधील रहिवाशांसह "तिरडी उठाव" आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. या आंदोलनाद्वारे पक्षाने सहा प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
१. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे व नियमित देखभाल करणे.
२. अकार्यक्षम कंत्राटदार मे. ओम इंडस्ट्रियल इंजी. सर्व्हिसेस यांची बिले थांबवणे व त्यांना काळ्या यादीत टाकणे.
३. प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे.
४. पाण्याच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यासाठी आधुनिक यंत्रणा बसवणे.
५. पाण्याच्या गुणवत्तेची माहिती जनतेसमोर ठेवणे.
६. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे.
मनसेचे पर्यावरण सेना अध्यक्ष अभिजित घरत, उलवे शहर अध्यक्ष राहुल पाटील आणि वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष दशरथ मुंढे यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. सिडको प्रशासनाने लवकरात लवकर या समस्येवर उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.
स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असताना सिडको प्रशासन कसे प्रतिसाद देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: