पुणे: श्री गणेशोत्सव २०२४ च्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) विसर्जन सोहळ्यासाठी व्यापक तयारी केली आहे. पालिकेच्या विद्युत विभागाने शहरभरात विशेष प्रकाशयोजना व सुरक्षा व्यवस्था राबविण्याची घोषणा केली आहे.
पालिकेच्या माहिती व जनसंपर्क कार्यालयाने जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, शहरातील २१ घाटांसह एकूण ३८२ ठिकाणी तात्पुरती प्रकाशयोजना उभारण्यात येत आहे. यामध्ये पाच परिमंडळांमध्ये विभागलेल्या विविध ठिकाणांचा समावेश आहे. आवश्यकतेनुसार जनरेटरची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहे.
पोलिसांच्या मागणीनुसार घाटांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. विसर्जन सोहळ्यादरम्यान नागरिकांना येणाऱ्या कोणत्याही विद्युतविषयक अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाकडील अधिकारी व कर्मचारी यांचे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
श्री गणपतींचे दर्शन घेण्यास येणाऱ्या भाविकांसाठी शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे सौंदर्य वाढविण्यात येत आहे. लाल महाल, नाना वाडा, शनिवारवाडा तसेच शहरातील प्रमुख पूल व मुठा नदीवरील विविध पुलांवर आकर्षक प्रकाशयोजना करण्यात येत आहे. तसेच पोलिसांच्या विनंतीनुसार कसबा गणपती व दत्त मंदिर चौक येथील फुटपाथवर नागरिकांच्या सोयीसाठी अतिरिक्त प्रकाशव्यवस्था करण्यात येत आहे.
विसर्जन सोहळ्यासाठी अलका चौक येथे उभारण्यात येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या स्वागत मंडपामध्ये तात्पुरती प्रकाशयोजना, ध्वनी व्यवस्था, जनरेटर व्यवस्था तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत.
या व्यापक तयारीमुळे पुणेकरांना सुरक्षित व आनंददायी गणेशोत्सव साजरा करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पालिका प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: