मुंबई : बृहन्मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने गोवंडी आणि गोरेगाव परिसरात केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आणि रोख रक्कम जप्त केली आहे. या कारवाईत एकूण २१३० नायट्रावेट टॅबलेट्स, २३ किलो गांजा आणि ६ लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
घाटकोपर युनिटने गोवंडी परिसरात केलेल्या कारवाईत एका महिला आरोपीकडून २१३० नायट्रावेट टॅबलेट्स आणि ६ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली. या टॅबलेट्सची अंदाजे किंमत ३ लाख ४७ हजार १०० रुपये आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत, कांदिवली युनिटने गोरेगाव परिसरात एका तस्कराकडून २३ किलो वजनाचा गांजा जप्त केला. या गांजाची अंदाजे किंमत ५ लाख ७२ हजार ५०० रुपये आहे. या प्रकरणीही एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दोन्ही कारवायांमध्ये जप्त केलेल्या अंमली पदार्थांची एकूण किंमत सुमारे ९.१९ लाख रुपये आहे. पोलिसांनी या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास सुरू केला आहे.
पोलीस उपायुक्त (अंमली पदार्थ विरोधी कक्ष) श्री. शाम घुगे यांनी नागरिकांना अंमली पदार्थांबाबत तक्रार करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या १९३३ या टोल फ्री क्रमांकाची माहिती दिली. हा हेल्पलाइन क्रमांक २४ तास कार्यरत असून, तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल. याशिवाय, मुंबईकरांसाठी १०० आणि ९८१९१११२२२ हे क्रमांकही २४ तास उपलब्ध आहेत.
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर आयुक्त (गुन्हे) शशिकुमार मीना, आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या यशस्वी कारवाईमुळे मुंबईतील अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर आळा घालण्यास मदत होणार असून, पोलीस अधिक कारवाया करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: