ठाणे: निवेदन आणि सूत्रसंचालन क्षेत्रातील तज्ज्ञ महेंद्र कोंडे यांच्या 'बोलता बोलता' या नवीन पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच ठाणे येथे झाले. सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांच्या हस्ते या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. व्यास पब्लिकेशन हाऊसने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला प्रा. दवणे यांनी 'यशस्वी निवेदनाचे पाठ्यपुस्तक' असे गौरवपूर्ण संबोधले.
प्रकाशन सोहळ्यात बोलताना प्रा. दवणे म्हणाले, "हे पुस्तक निवेदन क्षेत्रातील विविध पैलूंना स्पर्श करते. केवळ निवेदक किंवा सूत्रसंचालकांसाठीच नव्हे, तर व्यासपीठावर बोलू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल." त्यांनी पुढे सांगितले की या पुस्तकाच्या अभ्यासातून पुढील काही वर्षांत महाराष्ट्रात चांगल्या निवेदकांची फळी तयार होण्याची शक्यता आहे.
लेखक महेंद्र कोंडे यांनी या पुस्तकात वाद्यवृंदांचे बैठकी निवेदन, उभ्याने निवेदन, विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, आकाशवाणी, दूरदर्शन, एफएम वाहिन्या आणि ऑनलाइन कार्यक्रमांचे निवेदन अशा विविध विषयांचा समावेश केला आहे.
प्रकाशन सोहळ्यात कोंडे यांनी प्रा. दवणे यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. "प्रवीण सरांच्या वर्गातील बोलण्याच्या शैलीतूनच माझ्यात निवेदनाची बीजे रुजली," असे त्यांनी सांगितले.
व्यास पब्लिकेशन हाऊसच्या संचालक निलेश गायकवाड आणि प्रकाशिका वैशाली गायकवाड यांनी या पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल आनंद व्यक्त केला. प्रा. दवणे यांनी व्यास पब्लिकेशन हाऊसचे कौतुक करताना म्हटले की ही संस्था केवळ व्यावसायिक दृष्टीने नव्हे, तर समाजाला मूल्यशिक्षण देण्याच्या उद्देशाने पुस्तके प्रकाशित करते.
'बोलता बोलता' हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापकांपर्यंत पोहोचावे, अशी अपेक्षा प्रा. दवणे यांनी व्यक्त केली. निवेदिका वेदश्री दवणे यांनी या कौटुंबिक वातावरणातील प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: