पुणे: डी.एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्या कंपन्यांमध्ये ठेवी बुडालेल्या गुंतवणूकदारांनी आज पुण्यात एक मेळावा आयोजित केला. चैतन्य सेवाभावी संस्था (असोसिएशन ऑफ डीएसके फ्रॉड व्हिक्टिम्स) आणि हिंदू महासंघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात विविध राजकीय पक्षांनी गुंतवणूकदारांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला.
श्रमिक पत्रकार संघ सभागृहात झालेल्या या मेळाव्यात हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे प्रवक्ते अभिजित बोराटे उपस्थित होते.
मेळाव्यात बोलताना आनंद दवे यांनी गणेशोत्सवानंतर आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा दिला. ते म्हणाले, "जर राजकीय पक्षांनी गुंतवणूकदारांना न्याय देण्यासाठी पावले उचलली नाहीत, तर आम्ही त्यांच्या सर्व कार्यक्रमांना काळे झेंडे घेऊन उपस्थित राहू. विधानसभा निवडणुकीत आमची ताकद दाखवून देऊ."
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी गुंतवणूकदारांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आणि आचारसंहितेपूर्वी गुंतवणूकदारांच्या हिताचा निर्णय घेण्याची मागणी केली. शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) पृथ्वीराज सुतार यांनी डीएसके यांच्या मालमत्तेच्या मूल्यांकन आणि लिलाव प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी केली.
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे अभिजित बोराटे यांनी सरकार गुंतवणूकदारांची जबाबदारी झटकणार नाही असे सांगितले आणि येत्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांची गुंतवणूकदारांशी भेट घडवून देण्याचे आश्वासन दिले.
गुंतवणूकदारांचे प्रतिनिधी नितीन आडुळकर यांनी सरकारकडे असलेल्या मालमत्तांमधून गुंतवणूकदारांना पैसे मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. चैतन्य सेवाभावी संस्थेचे दीपक फडणीस यांनी गुंतवणूकदारांच्या एकजुटीचा पुनरुच्चार केला.
मेळाव्यात सीए आदिती जोशी यांनी आर्थिक बाबींवर प्रकाश टाकला, तर विद्या घटवाई यांनी सूत्रसंचालन केले. मनोज तारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर नितीन शुक्ल यांनी आभार मानले.
या मेळाव्यातून गुंतवणूकदारांच्या मागण्यांना राजकीय पाठिंबा मिळाला असला तरी, पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांच्या पैशांच्या वसुलीसाठी सरकार किती प्रभावी पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: