सांगली : सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील तडसर गावाचे तलाठी श्री. वैभव सुभाष तारळेकर (वय ४५) यांना दहा हजार रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ७/१२ उताऱ्यावर नोंद करण्यासाठी ही लाच मागितली होती.
एसीबीच्या सांगली पथकाचे पोलीस उप अधीक्षक संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तक्रारदार आणि त्यांच्या पुतण्याने एकमेकांना विकलेल्या शेतजमिनीची ७/१२ वर नोंद करून उतारा देण्यासाठी तलाठी तारळेकर यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती.
२० जून रोजी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर विभागाने तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर कडेगाव-तडसर रस्त्यालगत असलेल्या कृष्णा अपार्टमेंट येथे सापळा रचला. तेथे तलाठी तारळेकर यांनी तक्रारदाराकडून दहा हजार रुपये लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तलाठी वैभव तारळेकर हे कृष्णा अपार्टमेंट, कडेगाव-तडसर रोड, ता. कडेगाव, जि. सांगली येथे राहतात. त्यांचे मूळ गाव सरस्वतीनगर वासुंबे, ता. तासगाव, जि. सांगली हे आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर अधीक्षक विजय चौधरी आणि उप अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी आणि अंमलदार प्रितम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषीकेश बडणीकर, चंद्रकांत जाधव, सुदर्शन पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, अतुल मोरे, रामहरी वाघमोडे आणि चालक वंटमुरे यांचा सहभाग होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: