नंदुरबार : तळोदा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या निरीक्षकाला नवीन रेशन कार्ड बनवून देण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अधिकारी प्रमोद विश्वासराव डोईफोडे (रा. शिवण बिल्डिंग, महसूल कर्मचारी वसाहत, नंदुरबार) हे तळोदा तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एका नागरिकाचे नवीन रेशन कार्ड बनवून देण्यासाठी प्रथम १५०० रुपयांची मागणी केली होती. यापैकी १००० रुपये आधीच घेतल्यानंतर उर्वरित ५०० रुपयांसाठी त्यांनी पुन्हा मागणी केली.
२२ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ४:५२ ते ४:५८ या वेळेत तहसील कार्यालय, तळोदा येथील पुरवठा विभागाच्या कार्यालयात डोईफोडे यांनी फिर्यादीकडून ५०० रुपये लाचेची रक्कम स्वीकारली. या वेळी एसीबीच्या पथकाने सापळा रचून त्यांना रंगेहात पकडले.
या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात गु. रजि. नं. २४६/२०२४ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, निरीक्षक स्वप्निल राजपूत आणि पोलीस उपअधीक्षक राकेश आनंदराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत विलास पाटील, विजय ठाकरे, देवराम गावीत, नरेंद्र पाटील, सुभाष पावरा, हेमंतकुमार महाले, संदीप खंडारे आणि जितेंद्र महाले यांचा समावेश होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: