विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकाला ५,५०० रुपये लाच घेताना अटक

अहमदनगर:  अहमदनगर येथील वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दत्तू आश्रुबा सांगळे यांना ५,५०० रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. कर्ज व्याज परतावा योजनेचे प्रकरण पुढे पाठविण्यासाठी ही लाच मागितली होती.

एसीबीच्या अहमदनगर पथकाचे पोलीस उप अधीक्षक प्रविण लोखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यावसायिकाने इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा ऑनलाइन अर्ज भरला होता. हे प्रकरण प्रादेशिक कार्यालयाकडे पाठविण्यासाठी आरोपी सांगळे यांनी लाचेची मागणी केली होती.

२४ ऑगस्ट रोजी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर विभागाने तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी सापळा रचला गेला. या कारवाईत आरोपी सांगळे यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडून ५,५०० रुपये लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाणे, अहमदनगर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी दत्तू सांगळे हे वर्ग-१ अधिकारी असून, ते वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक आहेत. त्यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा व्यवस्थापकाचा अतिरिक्त कार्यभारही होता.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर, एसीबीने नागरिकांना भ्रष्टाचार किंवा लाचेच्या मागणीबाबत तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. तक्रारींसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टी.व्ही. सेंटरसमोर, सावेडी, अहमदनगर येथे संपर्क साधता येईल.

अधिक माहितीसाठी एसीबीच्या acbmaharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट देता येईल. तसेच कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२४१-२४२३६७७, टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा व्हाट्सअॅप क्रमांक ९९३०९९७७०० वर संपर्क करता येईल. ऑनलाइन तक्रारीसाठी acbmaharashtra.net या अॅप्लिकेशनचा वापर करता येईल.

विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकाला ५,५०० रुपये लाच घेताना अटक विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकाला ५,५०० रुपये लाच घेताना अटक Reviewed by ANN news network on ८/२८/२०२४ ०८:५५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".