पिंपरी: चिखली घरकुलमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानंतर सतत पाणी तुंबण्याचा त्रास होत आहे. याचे तातडीने निराकरण व्हावे अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
भापकर यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, चिखली घरकुल परिसरातील पावसाच्या पाण्याच्या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण व्हावे. या समस्येवर उपाय म्हणून सखल भागात जमा होणारे पाणी जवळील नाल्यात सोडण्यासाठी मोठ्या व्यासाच्या पाइपलाईनची व्यवस्था करावी. या पाइपलाईनच्या कामाला काही जागा मालकांनी विरोध केला आहे, परंतु कायद्याचा वापर करून महापालिकेने हे काम पूर्ण करावे.
भापकर यांनी हेही नमूद केले आहे की, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सहकार्याने चिखली घरकुल प्रकल्प उभारण्यात आला आहे, ज्यात ६७५० घरांचा समावेश आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार करताना उंच सखल भागाचा अभ्यास करून मंजुरी देण्यात आली. या परिसरात सुमारे २५ हजार लोक मागील दहा वर्षांपासून राहतात. मोठा पाऊस झाल्यानंतर उंच भागाचे पाणी सखल भागात जमा होते, त्यामुळे पाण्याच्या टाक्या, लिफ्ट, पार्किंगमधील गाड्या इत्यादींवर पाण्याचा प्रचंड परिणाम होतो. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
भापकर यांचे मत आहे की, पाणी तुंबण्याच्या समस्येवर नैसर्गिक प्रवाहानुसार पाण्याचा निचरा होणे आवश्यक आहे. परंतु काही जागा मालकांच्या विरोधामुळे हे काम रखडले आहे. महापालिकेने कायदेशीर अधिकारांचा वापर करून आणि आवश्यकतेनुसार बळाचा वापर करून, तातडीने या परिसरातील पाणी निचरा करावा. तसेच, जर या उपाययोजना तातडीने राबविल्या गेल्या नाहीत, तर घरकुल परिसरातील नागरिकांबरोबर आंदोलन करण्याचा इशारा भापकर यांनी दिला आहे. या आंदोलनाची सर्वस्व जबाबदारी महापालिका प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाची असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: