पिंपरी: मोहननगर, चिंचवड येथील सिद्धिविनायक मंदिराशेजारील चौकात महावितरणची केबल वारंवार खराब होण्याच्या समस्येचा सामना करताना स्थानिक नागरिक त्रस्त होते. सर्वे नंबर १२६ दातीर चाळ ते चिलेकरांचे दुकान आणि सिद्धिविनायक मंदिर ते लीलाविहार बिल्डिंग या भागातील रहिवाशांना या समस्येचा मोठा त्रास होत होता. या समस्येचे निराकरण म्हणून महावितरणकडून रस्ता खोदून केबल जोडण्यात येत होती, परंतु काही महिन्यांतच तीच समस्या पुन्हा उद्भवत होती.
माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून नवीन केबल टाकण्याची मागणी केली होती. त्यांनी सिद्धिविनायक मंदिर ते शेलार दुकानपर्यंत ३०० एम.एम.ची एल.टी. ५०-६० मीटर नवीन केबल टाकण्याचे आवाहन केले होते. नुकत्याच झालेल्या जनसंवाद सभेत त्यांनी महापालिका आयुक्तांना रस्ते न खोदण्याबाबत दिलेल्या सक्त आदेशांची आठवण करून देत, या समस्येचे निराकरण करण्यासाठी नवीन केबल टाकण्याची विनंती केली होती.
दि. २३ जुलैपासून पाऊस सुरू झाला आणि २५ जुलैला मुसळधार पावसामुळे सिद्धिविनायक मंदिर परिसरात पुन्हा बिघाड झाला. भापकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तातडीने समस्या सोडवण्याचे प्रयत्न केले. अखेर, २६ जुलैला रात्री १:४५ वाजता वीज पुरवठा पुन्हा सुरू झाला. परंतु, २७ जुलैला सकाळी ६:३० वाजता पुन्हा वीज पुरवठा खंडित झाला.
भापकर यांनी महावितरणच्या मुख्य कार्यकारी अभियंता अतुल देवकाते यांच्याशी संपर्क साधून नवीन केबल मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर, श्री. देवकाते यांनी नवीन केबल टाकण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले, ज्यामुळे २९ जुलैला होणारे आंदोलन रद्द झाले.
महावितरणच्या मुख्य अभियंता अतुल देवकाते आणि श्री. जाधव यांचे आभार मानून भापकर घरी परतले. मोहननगर परिसरात जेसीबीद्वारे खोदकाम सुरू झाले होते, ज्यामुळे नागरिकांना समाधान मिळाले. या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: